तीन बोगस दवाखाने बंद
By Admin | Updated: April 16, 2017 23:44 IST2017-04-16T23:26:01+5:302017-04-16T23:44:12+5:30
टेंभुर्णी : तीन बोगस दवाखाने कायमचे बंद करण्यात आले आहेत

तीन बोगस दवाखाने बंद
टेंभुर्णी : तालुका वैद्यकीय अधिकारी पथकाकडून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. शनिवारी १२ रुग्णालयांची अचानक झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली असून, या कारवाईत १० रुग्णालयास कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. तर तीन बोगस दवाखाने कायमचे बंद करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाई दरम्यान दोन बोगस डॉक्टरांनी धूम ठोकली.
जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठिक ठिकाणी वैद्यकिय व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकाने थाटली आहेत. या बोगस डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसतानाही बिनबोभाट रुग्णांच्या जीवघेणा उपचार सुरूच असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन अतिरिक्त आरोग्य संचालक यांनी तालुका आरोग्य विभागाला सक्त आदेश देऊन अशा बोगस रूगणालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये सदरील रुग्णालयाची तपासणी करून रुग्णालयाची नोंदणी बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार आहे किंवा नाही, गर्भपात सेवेसाठी गर्भपात प्रतिबंधक कायदा १९७१ नुसार नोंदणी आहे किंवा नाही, सोनोग्राफी केंद्राची नोंदणी प्रसुतीपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार झाली किंवा नाही, रुग्णालयातील औषधी दुकानास अन्न व औषध प्रशासनाकडून मंजुरी आहे किंवा नाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा नुसार बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल आहे किंवा नाही,अग्निशमन यंत्रे बसविले आहे किंवा नाही, आपली शैक्षणिक पात्रता वैद्यकीय क्षेत्राची उपचाराची सराव करण्यासाठी योग्य आहे किंवा नाही अशा बोगस रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या वरून तालुका वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मोटे, डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश आव्हाड, वैद्य, विसपुते व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे बोगस डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मोटे, डॉ. गणेश आव्हाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ज्या ज्या रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे अशा रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील कायद्याचा नियमावलीनुसार अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या कारवाई करण्यात आली आहे. जर हे बोगस रुग्णालय सुरू झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.