बार फोडणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:46 IST2017-04-18T23:45:56+5:302017-04-18T23:46:28+5:30
लातूर : लातूर तालुक्यातील बोपला शिवारात असलेल्या शुभम बारवर अज्ञात चौघांनी १५ एप्रिल २०१७ रोजी दरोडा टाकला होता.

बार फोडणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक
लातूर : लातूर तालुक्यातील बोपला शिवारात असलेल्या शुभम बारवर अज्ञात चौघांनी १५ एप्रिल २०१७ रोजी दरोडा टाकला होता. यामध्ये हॉटेलमध्ये झोपलेल्या कामगारांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातून तिघांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांच्या मुद्देमालासह चारचाकी वाहन जप्त केले आहे.
लातूर तालुक्यातील गोविंद दादाराव काळे (रा. बोरगाव काळे) यांचे बोपला शिवारात शुभम बार आहे. या बारवर अज्ञात चौघांनी १५ एप्रिल रोजी रात्री दरोडा टाकला. बारमध्ये झोपलेल्या तीन कामगारांना चोरट्यांनी मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधून कोंडून ठेवले. त्यानंतर या चौघांनी बारमधील विदेशी दारूचे बॉक्स (२ लाख ५० हजार रुपये), रोख १८ हजार रुपये, घड्याळ, दोन मोबाईल असा जवळपास पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गोविंद काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरोड्यातील आरोपी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह या चोरट्यांचा माग काढला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून स्थागुशाच्या पथकाने मंगळवारी पहाटे बप्पा श्रीपती काळे (४५), सुनील बप्पा काळे (१९, दोघेही रा. पळसप, जि. उस्मानाबाद), शंकर तानाजी शिंदे (२४, रा. भिकार सारोळा, जि. उस्मानाबाद) यांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स त्याचबरोबर चोरीत वापरलेला महिंद्रा पीकअप टेम्पो (एमएच २४ एबी ८०६३) हा जप्त केला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवळपास ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांनाही मुरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित एकाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)