तीन रेल्वे उड्डाणपुलांना मिळाली मंजुरी
By Admin | Updated: July 13, 2017 00:33 IST2017-07-13T00:29:24+5:302017-07-13T00:33:33+5:30
परभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून,

तीन रेल्वे उड्डाणपुलांना मिळाली मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच मानवत रोड आणि परतूर येथील तीन रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली असून, परभणी व परतूरच्या दोन पुलांसाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या उड्डाणपुलांच्या कामाच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे़
परभणी ते जालना रेल्वे मार्गावर दिवसभरात जवळपास १६० रेल्वे गाड्यांची ये-जा असते़ रेल्वे आल्यानंतर उड्डाणपूल नसल्याने रेल्वेमार्गावरील प्रमुख रस्त्यांचे फाटक बंद करण्यात येते़
परिणामी दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे किमान वर्दळीच्या रस्त्यांवर तात्काळ उड्डाण पूल उभारावेत, अशी नागरिकांची मागणी होती; परंतु, ही मागणी मंजूर होत नव्हती़
वर्दळीच्या रस्त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरून कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचा तसेच मानवत रोड येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रस्त्याचा आणि परतूर येथील रस्त्याचाही समावेश आहे़
या तिन्ही ठिकाणी प्राधान्याने रेल्वे उड्डाणपूल उभारावेत, यासाठी खा़ बंडू जाधव यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे भेट घेतली होती़
त्यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवत उड्डाणपुलांना मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन खा़ जाधव यांना दिले होते़
त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या तिन्ही मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयासमोरुन कृषी विद्यापीठात जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूर मंजूर करण्यात आली आहे़
यामध्ये केंद्र शासन २४ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार ३९ कोटी रुपयांचा निधी देणार आहे़
याशिवाय परतूर येथील रेल्वे पुलासाठी केंद्र सरकार १७ कोटी रुपये देणार असून, राज्य सरकार २७ कोटी रुपयांचा भार उचलणार आहे़ अशा ४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे़
येत्या महिनाभराच्या आत या दोन्ही रेल्वे पुलांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत़