साडेतीन कोटींचा निधी मंजूर
By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-02T23:59:54+5:302014-07-03T00:22:22+5:30
कंधार : तालुक्यातील गावाची निकडीची कामे करण्यासाठी सन २०१४-१५ साठी मागास क्षेत्र विकास निधी ३ कोटी ४७ लाख २४ हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची बाब समोर आली आहे़

साडेतीन कोटींचा निधी मंजूर
कंधार : तालुक्यातील गावाची निकडीची कामे करण्यासाठी सन २०१४-१५ साठी मागास क्षेत्र विकास निधी ३ कोटी ४७ लाख २४ हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची बाब समोर आली आहे़ विकासकामांतून गावांचा कायापालट होणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़
तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून १२६ महसूली गावांची संख्या आहे़ एकूण गावे, वाडी-तांड्याची संख्या १८७ आहे़ बालाघाटच्या डोंगरानी हा भाग व्यापला आहे़ नैसर्गिक स्थिती, निसर्ग पावसावरील शेती, मोठ्या उद्योगधंद्याचा अभाव आदीमुळे अपेक्षित विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागतो़ प्रश्न, समस्या लहान असली तरी सोडविण्यासाठी कसरत करावी लागते़ शासनस्तरावरील विविध योजना गावात येण्यासाठी पुढाऱ्यासह अधिकारी यांना पाठपुरावा करावा लागतो़ कामासाठीचा निधी मंजूर झाला की, गावकऱ्यांत मोठा उत्साह संचारतो़
यापूर्वी मंजूर झालेल्या निधीतून १ कोटी ६ लाख ६५ हजारांची कामे प्रगतीपथावर आहेत़ ग्रा़पं़च्या स्वत:च्या काही निधी ४२ लाख ४८ हजारांचा आहे़ यावर्षी बीआरजीएफपीमधून ३ कोटी ४७ लाख २४ हजार निधी मंजूर झाला आहे़ एकूण ४ कोटी ९६ लाख ३७ हजार किंमतीची १७७ कामांतून गावच्या समस्या दूर होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे गावाला नवे रूप प्राप्त होणार आहे़
गावातील स्मशानभूमीला संरक्षक भिंत, स्मशानभूमी शेड, पाणीपुरवठा, जलकुंभ, वर्गखोली, शाळा संरक्षक भिंत, सौरउर्जा, पथदिवे, संगणककक्ष, ग्रामपंचायत कार्यालय संरक्षक भिंत, पूल, अंगणवाडी संरक्षक भिंत, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, समाजमंदिर, कम्युनिटी हॉल जलशुद्धीकरण यंत्र आदी कामे मार्गी लागणार आहेत़ शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण दळणवळण पाणी, समाजकल्याण आदी क्षेत्रातील विकासामुळे गावांचा कायापालट होणार आहे़ यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करून नवीन कामे वेळेत पूर्ण केल्यास विकासाला मोठी चालना मिळणार आहे़(वार्ताहर)
विविध विकासकामांचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता़ नियोजन समितीतील पालकमंत्री, आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यास मंजुरी दिली़ प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध होणार आहे़ निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल़ त्यातून विकासास मोठी चालना मिळेल - ए़एस़ कदम (बीडीओ, कंधार)