खरिपासाठी सोयगावला कपाशी बियाणाचे साडेतीन लाख पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST2021-05-07T04:06:12+5:302021-05-07T04:06:12+5:30
सोयगाव : खरीप हंगामासाठी सोयगाव तालुक्याला कपाशी बियाणांचे साडेतीन लाख पाकिटे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्याची माहिती कृषी विस्तार अधिकारी ...

खरिपासाठी सोयगावला कपाशी बियाणाचे साडेतीन लाख पाकिटे
सोयगाव : खरीप हंगामासाठी सोयगाव तालुक्याला कपाशी बियाणांचे साडेतीन लाख पाकिटे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्याची माहिती कृषी विस्तार अधिकारी अजय गवळी यांनी गुरुवारी दिली. खरीप बियाणांची विक्री १ जूनपासून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात खरिपाचे ४३ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. त्यापैकी मागील खरीप हंगामात २८ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा मात्र पुन्हा नव्याने दोन हजार हेक्टरवर कपाशी लागवडीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सोयगाव तालुक्यासाठी कपाशी बियाणांची साडेतीन लाख पाकिटे उपलब्ध करण्यात आली असून, हे बियाणे शेतकऱ्यांना १ जूननंतर उपलब्ध होणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयगाव तालुक्यात सात हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र पिके जोमात असताना अतिवृष्टीने सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा सोयाबीनची लागवड घटणार असून, कपाशी आणि मक्याच्या लागवडीत होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
चौकट
हंगामपूर्व लागवडीसाठी बियाणे उपलब्ध नाही
कापूस संशोधकांच्या मतानुसार अद्यापही बोंडअळींचा जीवनक्रम खंडित झालेला नाही. त्यामुळे बोंडअळीच्या पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार होऊन प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही याची शासन दक्षता घेणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना हंगामपूर्व बियाणे उपलब्ध करून न देण्याचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना १ जूनपासून बियाणे उपलब्ध होणार आहे.