चोरांच्या संशयावरून ग्रामस्थांची दोन वाहनांवर दगडफेक

By Admin | Updated: August 23, 2015 23:46 IST2015-08-23T23:36:02+5:302015-08-23T23:46:04+5:30

येणेगूर : चोरट्यांची अफवा पसरल्यामुळे गावात गस्त घालणाऱ्या ग्रामस्थांच्या जमावाने मुरूमकडे जाणाऱ्या दोन वाहनांवर चोरटे आल्याचे समजून दगडफेक करून

Threats of thieves on the two vehicles of the villagers | चोरांच्या संशयावरून ग्रामस्थांची दोन वाहनांवर दगडफेक

चोरांच्या संशयावरून ग्रामस्थांची दोन वाहनांवर दगडफेक


येणेगूर : चोरट्यांची अफवा पसरल्यामुळे गावात गस्त घालणाऱ्या ग्रामस्थांच्या जमावाने मुरूमकडे जाणाऱ्या दोन वाहनांवर चोरटे आल्याचे समजून दगडफेक करून नुकसान केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील नाईकनगर तांडा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री गावात चोरटे आल्याची माहिती नाईकनगर तांड्यावर पसरली होती. त्यामुळे तेथील काही रहिवाशी रात्री हातात काठ्या घेऊन गटागटाने गस्त देत फिरत होते. रात्री एक वाजेच्या सुमारास हे सर्वजण तांड्यानजीकच्या मुरूम रस्त्यावर एकत्रित जमा झाले. नेमके याच वेळी मुरूम येथील सराफा व्यापारी अमोल मधुकर वेदपाठक हे एमएच १३/ एझेड ५५११ या क्रमांकाच्या कारमधून मुरूम मोडहून मुरूम गावाकडे जात होते. रस्त्यावर थांबलेला जमाव पाहून कारच्या चालकाने वाहन न थांबविता तसेच पुढे नेले. त्यामुळे तांड्यावरील लोकांना याच वाहनातून चोरटे आले असावेत, असा संशय आल्याने त्यांनी कारवर दगडफेक सुरू केली. यात कारचे मोठे नुकसान झाले.
या प्रकारानंतर काही वेळात मुरूम येथील शहानू पाटील हे देखील जीप (क्र. एमएच १३/ एसी ९०९५) मधून मुरूमकडे जात होते. त्यांनीही जमाव पाहून जीप थांबविली नसल्यामुळे या जमावाने त्यांच्या जीपवरही दगडफेक केली. या हल्ल्यातून सुटका करून घेत या दोघांनी मुरूम पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पेट्रोलिंगवर असलेले पोउपनि आर. ए. मोमीन, रत्नदीप बिराजदार, मानाजी पाटोळे, डी. जी. पठाण, चालक गायकवाड यांनी घटनास्थळी जावून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे समजू शकली नाहीत. केवळ गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोउपनि युवराज पोठरे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Threats of thieves on the two vehicles of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.