खरीप पेरणी वाया जाण्याची भीती!
By Admin | Updated: July 2, 2017 00:38 IST2017-07-02T00:37:34+5:302017-07-02T00:38:07+5:30
जाफराबाद : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.

खरीप पेरणी वाया जाण्याची भीती!
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील ६० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.
तालुक्याचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मागील वर्षात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने पेरण्या तोंडावर आल्या असताना जवळ आहे त्या पैशांत बी-बियाणांवर खर्च करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पडून जमिनीतून वाहून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात दुबार पेरणी करून यावर पाणीच पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाळ्या पूर्वी भाव न मिळाल्याने कोणती पिक घ्यावयाचे या विषयी शेतकरी संभ्रमावस्थेत होता. त्यातून सावरत लागवड केली आहे. आता फक्त निळ्या आभाळाकडे नजर लागून आहे.
मागील वर्षी तालुक्यातील ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. या वर्षात पावसाळा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने जवळपास ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन तालुक्याच्या बोरगाव बु., हिवराबळी या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला आहे. तरी देखील पिके येण्याची हमी नाही. तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे तालुक्याचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. मागील दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकरी अडचणीत आहे. कृृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.