मनपाला देतात हजार-बाराशे; स्वत: घेतात चौपट

By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-23T00:05:05+5:302014-07-23T00:31:33+5:30

आशपाक पठाण , लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वत:च्या जागेत जवळपास १ हजार ७७ गाळे आहेत़ भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळ्यांचे मनपाला वार्षिक १ कोटी ८१ लाख रूपये भाडे मिळते़

Thousands of twelve hundred; Take fourfold yourself | मनपाला देतात हजार-बाराशे; स्वत: घेतात चौपट

मनपाला देतात हजार-बाराशे; स्वत: घेतात चौपट

आशपाक पठाण , लातूर
शहर महानगरपालिकेच्या स्वत:च्या जागेत जवळपास १ हजार ७७ गाळे आहेत़ भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळ्यांचे मनपाला वार्षिक १ कोटी ८१ लाख रूपये भाडे मिळते़ प्रारंभी गाळेधारकांना ठरवून दिलेल्या भाड्यातही २५ टक्के कमीनेच अनेक ठिकाणची वसुली होते़ चार पत्र्याची खोली लातुरात भाड्याने घ्यायची असेल तर जवळपास २ हजार रूपये भाडे मोजावे लागते़ बाजारपेठेत तर खोली मिळणेच कठीण आहे़ तत्कालीन नगरपालिकेने मात्र नाममात्र दरात गाळ्यांचे वाटप केले आहे़
शैैक्षणिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या लातूर शहरात शाळा-महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वसामान्यांना सहजपणे खोली भाड्याने मिळणे कठीण आहे़ एका खोलीत तीन ते चार विद्यार्थी कॉट बेसिसवर ठेवून किमान ४ हजार रूपये भाडे वसूल केले जाते़ पत्र्याच्या खोलीलाही किमान १२०० ते २ हजारांपर्यंत भाडे घेतले जाते़ दुसरीकडे मात्र, महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे अगोदरच अत्यल्प असताना त्यालाही सत्ताधारी कात्री देण्याच्या तयारीत आहे़ एकीकडे मनपा आर्थिक डबघाईला आल्याची चर्चा होत असताना उत्पन्न घटविण्याची उठाठेव सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल व उपमहापौर सुरेश पवार यांनी केली आहे़
लातूर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत हातभर जागा मिळणे कठीण आहे़ एखाद्याच्या दुकानासमोर हातगाडा उभा करायचा असेल तर किमान १०० रूपये भाडे घेतले जाते़ याठिकाणी मनपाचे १३२ गाळे आहेत़ त्यापैकी बाहेरच्या बाजूने असलेल्या गाळ्यांना २ हजार व आतील बाजूस ९०० रूपये व पहिल्या मजल्यावर १५०० रूपये भाडे आकारण्यात आले आहे़ मिनी मार्केट येथे असलेल्या ५२ गाळ्यांना प्रत्येकी १२०० रूपये भाडे असून गंजगोलाई व मिनीमार्केट दोन्ही ठिकाणच्या लाभार्थ्यांकडून ठरवून देण्यात आलेल्या भाड्यापेक्षा २५ टक्के रक्कम कमी घेतली जात असल्याचे मनपाच्या मालमत्ता विभागातून सांगण्यात आले़
गांधी मार्केट येथे १४६ गाळे असून बाहेरच्या बाजूच्या गाळ्यांना १५०० रूपये तर आतील बाजूस ९०० रूपये भाडे घेतले जाते़ महात्मा गांधी चौकात बाहेरच्या बाजूने १९ तर आतील बाजूस ३१ दुकाने आहेत़ आतील बाजूस असलेल्या गाळ्यांना मासिक १ हजार ५०० रूपये भाडे आहे़ बाहेरच्या बाजूस असलेल्या १९ गाळ्यांचे भाडे लिलाव पध्दतीने आकारण्यात आली होती़ याठिकाणी १ हजार ९०० ते ३ हजार ४०० रूपये भाडे आहे़ इतर ६० गाळ्यांनाही १५०० रूपये भाडे आहे़
भाडेही कमी होणार..!
मनपात काँग्रेसचे बहुमत आहे़ त्यामुळे काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल व उपमहापौर सुरेश पवार यांनी भाडे कमी करण्यासाठी दिलेल्या पत्रावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे़ मात्र, त्यावर विरोधी सदस्य सभेत काय भूमिका घेतील, २५ जुलै रोजी कळेल.
कुठे किती आहे भाडे...
मनपाच्या मालकीच्या जागेत गांधी मैदान येथे तळमजल्यात ११०, पहिल्या मजल्यावर ९४ गाळे आहेत़ पहिल्या मजल्यावर ३७५ व तळमजल्यात ६०० रूपये भाडे आकारण्यात आले होते़ त्यानंतर त्रिस्तरीय समितीने मांडलेल्या ठरावात तळमजल्यातील गाळ्यांना ९८४ ते १५८४ रूपये, पहिल्या मजल्यावर ३७५ ते ९७५ रूपये मासिक भाडे आहे़ साईड क्ऱ ११२ वर १२९ गाळे आहेत़ याठिकाणी तळमजला १३३४ ते २०८४, पहिल्या मजल्यावर असलेल्या ११३ गाळ्यांना ७७५ ते १३७५ रूपये भाडे आहे़ सारोळा येथे असलेल्या २३ गाळ्यांना प्रत्येकी ७०० रूपये, आजी-आजोबा पार्क येथे असलेल्या गाळ्यापैकी केवळ २ गाळे सुरू असून त्यांना ९८० रूपये व साईट क्ऱ ८२ मधील १६६ गाळ्यांना प्रत्येकी ७०० रूपये भाडे आकारण्यात आले आहे़ याठिकाणी गाळे बांधली परंतू ती वापरात आली नसल्याने या भागात दयनीय अवस्था आहे़
२ कोटी ८१ लाखांचे उत्पन्ऩ़़
महापालिकेला या गाळ्यांचे वार्षिक १ कोटी ८१ लाख रूपये भाडे मिळते़ काही लाभार्थी सहा-सहा महिने भाडे देत नाहीत़ पोटभाडेकरू ठेवून मनपाने दिलेल्या भाड्यापेक्षा पाच ते दहापट अधिक भाडे घेण्यात येते़ यातून काही लाभार्थ्यांनी मनपाच्या मालकीच्या दुकानांचा ‘धंदा’च सुरू केला आहे़ याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़

Web Title: Thousands of twelve hundred; Take fourfold yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.