आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी
By Admin | Updated: July 19, 2014 00:45 IST2014-07-19T00:25:21+5:302014-07-19T00:45:34+5:30
नांदेड : दूषित पाण्यामुळे आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे़
आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी
नांदेड : दूषित पाण्यामुळे आसना नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत़ यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे़
नांदेड शहरालगत आसना नदी वाहते़ गाडेगाव शिवारात सुमारे दोन किलोमीटर परिसरात आसनेचे पाणी अडवून ठेवण्यात आले आहे़ येथील पाणी पूर्णत: दूषित झाले असून त्याचा रंगही बदलल्याचे दिसून येत आहे़
दोन दिवसांपासून नदीपात्रात हजारो जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत़ मृत मासे पाण्यावर तरंगत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे़ आयते खाद्य मिळाल्याने बगळे व अन्य पक्षांचे थवे मृत माशांवर ताव मारण्यासाठी गर्दी करत आहेत़ मात्र दूषित पाण्यामुळे आसना पात्रातील जलजीवन धोक्यात आले आहे़ दूषित पाण्यामुळे केवळ मासेच नव्हे, तर साप व अन्य जलचर प्राणीही मृत्युमुखी पडल्याचे दिसून येते़
आसना नदीपात्रालगत अनेक शेतकरी पशूसह शेतात वास्तव्यास आहेत़ पाऊस नसल्याने बोअरवेल, विहिरी आटल्या आहेत़ त्यामुळे जनावरांना पाणी पाजवण्यासाठी शेतकरी आसना नदीपात्रात आणतात़ परंतु आसनेचे पाणी दूषित बनल्याने हे पाणी जनावरांना पाजवण्यास शेतकरी धजावत नाहीत़ शिवाय दुर्गंधीने परिसरात रोगराई पसरुन येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ (प्रतिनिधी)