जनजागृतीअभावी हजारो शेतकरी राहिले पीकविम्यापासून वंचित

By Admin | Updated: July 4, 2014 00:14 IST2014-07-03T23:39:04+5:302014-07-04T00:14:51+5:30

चाकूर/चापोली : शासनाने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली आहे.

Thousands of farmers remained absent from public awareness due to public awareness | जनजागृतीअभावी हजारो शेतकरी राहिले पीकविम्यापासून वंचित

जनजागृतीअभावी हजारो शेतकरी राहिले पीकविम्यापासून वंचित

चाकूर/चापोली : शासनाने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली आहे. मात्र या विमा योजनेची वेळीच जनजागृती झाली नसल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे चापोलीसह चाकूर तालुक्यातील अनेक शेतकरी या विमा योजनेपासून वंचित राहिले.
शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपुरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकांच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली. मात्र ही योजना आहे तरी काय, याची जनजागृतीच झाली नाही. ३ ते ४ दिवसांत ज्या शेतकऱ्यांना या विमा योजनेची माहिती मिळाली, त्यांनी पिकांचा विमा उतरविला.
या विमा योजनेत खरीपाच्या सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग या मुख्य चार पिकांचा समावेश करण्यात आला आहे. हा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ ३ ते ४ दिवसांची मुदत मिळाली होती. यामुळे शेतकरी सातबारा काढण्यासाठी महा-ई सेवा केंद्र, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती व सोमवारी विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत तर तोबा गर्दी झाली होती. बँकेचे कामकाज रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू होते.
गेल्या वर्षीच्या खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी पेरणी झाल्यावर पावसाने उघाड दिली होती व नंतर तब्बल २० ते २५ दिवस सतत भिज पाऊस पडला. यामुळे पिकांची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळच भेटला नाही. सोयाबीन काढणी वेळेस परत पावसाने झोडपले. याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पन्न घटले. तसेच रबी हंगामही गारपिटीमुळे हातचा गेला.
हवामान आधारित पीकविमा योजनाही अशा नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांंना आधार देण्याचे काम करील, मात्र शेतकऱ्यांसाठी ‘संजीवनी’ ठरेल अशा या विमा योजनेची जनजागृती झाली नसल्याने व विमा भरण्यासाठी केवळ ३ ते ४ दिवसांचा अवधीच मिळाल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. या विमा योजनेत सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी ९१२ रु. ची रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. यात जर २० जून ते ५ जुलै दरम्यान ८० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडल्यास प्रति हेक्टरी २५०० रु. शेतकऱ्यांना भेटणार आहेत.
गेल्या वर्षीचा हंगाम हा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचा गेला होता. तसेच सध्याची परिस्थिती ही तशीच दिसत आहे. अजूनही परिसरात १ टक्काही पेरणी झाली नाही. त्यामुळेही हवामानावर आधारित पीकविमा योजना शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम करणार होती. मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. (वार्ताहर)
७४९ शेतकऱ्यांनी भरला विमा...
चापोली परिसरातील चापोलीसह शंकरवाडी, ब्रह्मवाडी, अजनसोंडा, येणगेवाडी, आनंदवाडी, हिंपळनेर, नायगाव, हणमंत जवळगा, लिंबवाडी या गावातील ७४९ शेतकऱ्यांनी ११ लाख ११ हजार रुपयांचा पीकविमा भरल्याची माहिती चापोली येथील मध्यवर्ती बँकेकडून मिळाली आहे.
हा पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी तुकाराम कासले यांच्याशी संपर्क साधला असता मुदतवाढ मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: Thousands of farmers remained absent from public awareness due to public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.