तुळजापुरात भाविकांचा महापूर
By Admin | Updated: October 9, 2014 00:37 IST2014-10-09T00:35:53+5:302014-10-09T00:37:47+5:30
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विनी पौर्णिमेनिमित्ताने तुळजापुरात अक्षरश: भाविकांचा महापूर लोटला.

तुळजापुरात भाविकांचा महापूर
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विनी पौर्णिमेनिमित्ताने तुळजापुरात अक्षरश: भाविकांचा महापूर लोटला. दरम्यान, गुरुवारी महाप्रसाद आणि रात्रीच्या मानाच्या काठ्यासोबत छबिना मिरवणुकीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
पौर्णिमेनिमित्त रात्री दीड वाजता चरणतीर्थ होऊन त्यानंतर देवीला पलंगावरून सिंहासनावर आरुढ करण्यात आले. यानंतर सरकारी आरती व पुजाऱ्यांच्या आरत्या, नैवेध आदी विधी पार पडले. या विधिनंतर विशेष महाभिषेक पार पडले. यावेळी महंत चिलोजीबुवा, तुकोजीबुवा, भोपी पुजारी मलबा दिनेश परमेश्वर, शशीकांत पाटील, सुधीर कदम, सचिन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, व्यवस्थापन सुजित नरहरे, सेवेकरी, छत्रे, बब्रुवान पलंगे, अंबादास औटी, गौतम पवेकर, नारायण पलंगे, पालखीवाले अर्जून भगत, पलंगवाले बाबूराव अंबादास, राजेंद्र गोंधळी यांच्यासह आराधी, देवीभाविक, पुजारी, उपाध्ये उपस्थित होते. बुधवारी सकाळी दहा वाजता शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यांचे आगमन बारालिंग येथे झाले. यावेळी नगराध्यक्षा जयश्री कंदले, विजय कंदले यांनी काठ्यांची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर काठ्या भोपे पुजारी सचिन प्रकाश पाटील यांच्या घरी सवाद्य मिरवणुकीद्वारे दोन दिवशीय मुक्कामासाठी दाखल झाल्या. याच काठ्याबरोबर बुधवार व गुरुवार या दोन दिवशी देवीचा छबिना निघणार आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात दहा लाख भाविकांनी शहरात हजेरी लावली होती.
दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच तुळजापूर शहराला जोडणारे उस्मानाबाद, नळदुर्ग, लातूर आणि सोलापूर हे चारही रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बुधवारी घाटशीळ परिसर, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, किसान चौकी, कमानवेस, महाद्वार परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पायी चालून पायांना जखमा झालेले भाविक चक्क मिळेल त्या जागेवर अगदी रस्त्यावर विश्रांती घेताना दिसून आले. या शिवाय ठिकठिकाणी हलगी व संबळाच्या निनादात आराध्यांची गाणी सुरूच होती. क्रांती चौकात संपूर्ण रस्ता जोगवा मागणाऱ्यांच्या गर्दीने खचाखच भरला होता. परड्यात मीठ, पीठ, दक्षिणा टाकून असंख्य भाविक नवस-सायास पूर्ण करताना दिसून आले. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी देवीच्या अभिषेकासाठी आराधवाडीच्या वाहनतळापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर वाढत्या गर्दीमुळे दर्शन मंडपातील सर्वच मजले भाविकांनी खचाखच भरले होते. महाद्वारातही प्रचंड गर्दी होती. तुळजा भवानी मातेचा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने दाखल होत होते. (वार्ताहर)