हजारो भाविकांनी घेतले नागोबाचे दर्शन

By Admin | Updated: August 20, 2015 00:44 IST2015-08-20T00:41:23+5:302015-08-20T00:44:56+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे अमावस्येपासून सुरू असलेल्या नागोबा यात्रेची सांगता बुधवारी नागपंचमी दिवशी भाकणूक आणि गण मिरवणुकीने झाली.

Thousands of devotees took a glimpse of Nagoba | हजारो भाविकांनी घेतले नागोबाचे दर्शन

हजारो भाविकांनी घेतले नागोबाचे दर्शन


तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे अमावस्येपासून सुरू असलेल्या नागोबा यात्रेची सांगता बुधवारी नागपंचमी दिवशी भाकणूक आणि गण मिरवणुकीने झाली. यात्रेनिमित्त अमावस्येपासून एकत्रित असलेले साप, पाल, विंचू या जलचर प्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणाहून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
आषाढ अमावस्येपासून नागोबा यात्रेस प्रारंभ झाला. मानकऱ्यांनी नागोबा मंदिर, महादेव मंदिर व नागपूर ठाणे येथे भगवी पताका लावल्यानंतर साप-पाल-विंचू या जलचर प्राण्यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. बुधवारी नागपंचमीनिमित्त पहाटे पाच वाजता नागोबा मूर्तीस पूजा, अभिषेक घालण्यात आला. दुपारी पुजारी कल्याण स्वामी यांच्या निवासस्थानात विधी पूर्ण करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. हनुमान मंदिरात संजय कोळी यांनी आणलेल्या जलकुंभातील पाण्याने पुजारी स्वामी यांना स्रान घातल्यानंतर पुढे गावातील प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत ही पालखी मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ झाली.
सायंकाळी साडेपाच वाजता खरगा, भाकणूक, पंचारती, दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध ठिकाणाहून पन्नास हजाराच्या आसपास भाविक येथे आले होते. यात्रेदरम्यान तामलवाडी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यात्रा यशस्वीतेसाठी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी, सरपंच प्रभावती मारडकर, उपसरपंच आनंद बोबडे, पंचायत समितीचे सदस्य विलास डोलारे, माजी सरपंच राजकुमार पाटील यांच्यासह मालिंग गोबणे, बाळू तानवडे, दत्ता लिंगफोडे, गजेंद्र तोडकरी, जनार्दन तानवडे, महारूद्र अक्कलकोटे, पिंटू तानवडे, गणपत तानवडे, दत्ता काडगावकर, धनाजी काडगावकर, गंगाधर बावणे, तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Thousands of devotees took a glimpse of Nagoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.