सुमारे दीड लाख नागरिकांना त्रास
By Admin | Updated: May 27, 2014 01:21 IST2014-05-27T01:04:24+5:302014-05-27T01:21:27+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात.

सुमारे दीड लाख नागरिकांना त्रास
औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात. मागील चार महिन्यांपासून विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाला सहा महिन्यांपासून उपअभियंताच नाही. त्यामुळे दुरुस्तीची शेकडो कामे ठप्प पडली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी विविध वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येतात. यंदा उन्हाळ्यात वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणार्या वॉर्डांमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावर गंभीर समस्या निर्माण होणार आहे. १६ वॉर्डांमध्ये ठिकठिकाणी मिळून शंभरहून अधिक लिकेज आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास पावसाचे साचलेले पाणी जलवाहिन्यांमध्ये जाईल. त्यामुळे दूषित पाणी नागरिकांना पिण्याची वेळ येणार हे निश्चित. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे दीड लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला उपअभियंता द्यावा, अशी मागणी वॉर्डातील दहापेक्षा अधिक नगरसेवकांनी प्रशासनाला केली. मात्र, प्रशासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंताच मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहत आहेत. अलीकडेच कार्यकारी अभियंताही आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग पोरका झाला आहे. कनिष्ठ अभियंत्याकडे उपअभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यास प्रशासन तयार नाही. दुसर्या वॉर्डातील उपअभियंत्याला अतिरिक्त कार्यभार देण्यासही टाळाटाळ होत आहे. (लोकमत ब्युरो) आंदोलनाचा इशारा वॉर्डाला उपअभियंताच नसल्याने पाणीपुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहेत. पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासनाने नवीन अधिकार्याची नेमणूक न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला अधिकारी द्यावा, या मागणीकडे मनपा प्रशासन गांभीर्याने बघायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.