महिलांविषयक गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी
By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-11T23:24:00+5:302014-05-12T00:08:23+5:30
उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़

महिलांविषयक गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी
उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़ चालू वर्षी चार महिन्यातील महिला विरोधी गुन्हेगारीची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे़ या कालावधीत एकीचा हुंड्यासाठी खून झाला असून, ११ विवाहितांनी जीवनयात्रा संपविली आहे़ तर १३ जणी बलात्कारासारख्या क्रूरकृत्याच्या बळी ठरल्या आहेत़ जाचाचे ४८ तर विनयभंगाचे ३९ गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद आहेत़ स्पर्धेच्या युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध योजनांसह आरक्षणही लागू करण्यात आले आहे़ मात्र, धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या युगात शहरासह ग्रामीण भागातील महिला, युवती खर्याच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न समोर येत आहे़ जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारी नोंद रजिस्टरमध्ये महिलांच्या आलेल्या तक्रारी आणि गुन्ह्यांचे प्रकार पाहता स्पर्धेच्या युगात शिक्षितच अज्ञानी आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो़ जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीत हुंड्यासाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी खून केला आहे़ दोघींचा हुंड्यासाठी बळी गेला आहे़ ११ जणींनी जाचास कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे़ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत़ तर १३ युवती, महिला या बलात्कारासारख्या नीच कृत्याच्या शिकार ठरल्या आहेत़ तब्बल ४८ विवाहितांनी जाचप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत़ काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर रस्त्यावर, शेतात, नव्हे स्वत:च्या घरात सुरक्षित असतानाही जिल्ह्यातील ३९ जणींचा काही महाभागांनी विनयभंग केला आहे़ तर छेडछाड प्रकरणी एक गुन्हा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी) कारणांचा शोध आवश्यक महिला, मुलींवरील वाढलेले अत्याचार, जाचहट, हुंडाबळी आदींची मुख्य कारणे शोधण्याची वेळ आली आहे़ आरक्षण, कायदे लागू करूनही याघटनांची तीव्रता कमी होताना दिसत नाही़ त्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी व विक्रत लोकांवर कठोर कारवाईसाठी कारणांचा शोध घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे़ तक्रार निवारण केंद्राची मदत पोलिस दलांतर्गत विवाहित दाम्पत्यात झालेली भांडणे सोडविण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे़ गत अनेक वर्षापासून या महिला तक्रार निवारण केंद्रातून अनेकांचे संसार पुन्हा फुलले आहेत़ मात्र, तडजोडीत ज्यांचे जमतच नाही त्यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ फिरते पथक कार्यरत युवती, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी विविध प्रकार रोखण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले आहे़ उस्मानाबाद येथील या पथकाने वारंवार रोडरोमिओंसह इतर टवाळखोरांवर कारवाई करून वचक निर्माण केला आहे़ मात्र, अनेकांना कायद्याची आणि कारवाईची भिती नसल्याने या घटना सुरूच असल्याचे चित्र आहे़ सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी, समाजात पाश्चात संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण होत आहे़ पूर्वीप्रमाणे एकत्रित कुटुंब पध्दती कमी प्रमाणात आहे़ भौतिक सुखसुविधांचा मोह वाढत आहे़ मूल्यांवर समाधान मानणारे कमी प्रमाणात असल्याने अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. जुन्या मूल्यांची जपणूक करून एकमेकांच्या अडचणी चर्चेतून सोडविल्यानंतर अत्याचाराच्या घटना कमी होतील, अशी आशा मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी दिली़