पैठणच्या उद्यानातील वृक्षतोडीने हजारो पक्षी बेघर
By Admin | Updated: February 3, 2015 01:01 IST2015-02-03T00:46:15+5:302015-02-03T01:01:01+5:30
पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान प्रशासनाने याबाबत तातडीने गुन्हा दाखल केला.

पैठणच्या उद्यानातील वृक्षतोडीने हजारो पक्षी बेघर
पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान प्रशासनाने याबाबत तातडीने गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ कृषी चिकित्सालय फळ रोपवाटिका कृषी विभागाने वृक्षतोडीबाबत पैठण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या अवैध वृक्षतोडीमुळे हजारो पक्षी बेघर झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
हजारो वृक्षांची कत्तल झाल्यानंतरही पैठण वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.
पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरातील टेकड्यांवर राज्य शासनाने परिसर विकास पथक असा स्वतंत्र विभाग निर्माण करून या परिसरात जवळपास दीड लाख वृक्ष लावून ते जगवून मोठे केले होते. यामुळे या परिसराला घनदाट वनराईचे स्वरूप बहाल झाले होते. अलीकडच्या काळात लाकूड तस्करांनी या भागात बेसुमार वृक्षतोड करून हा भाग उजाड रानात परावर्तित केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या परिसरातून आंबा मातृ वृक्ष ६५ यासह पेरूचे मातृ वृक्ष ५०, जांभूळ झाडे व लिंबाची झाडे तोडून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर उद्यानात वन खात्याच्या वन्यजीव विभागासाठी २५ एकर जागा देण्यात आलेली आहे. ही जागा त्यांच्या ताब्यात असून, येथे रक्षणासाठी एक वनरक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही त्यांच्या भागातून शेकडो झाडे तोडण्यात आलेली आहेत. झाडे तोडल्यानंतर तहसीलदार संजय पवार यांनी या विभागाचे वनरक्षक चक्रे यांना बोलावून झालेली वृक्षतोड दाखविली. याबाबत तातडीने पंचनामा करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एवढे होऊनसुद्धा वनखात्याने कारवाई केलेली नाही.