माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला
By Admin | Updated: June 13, 2014 00:32 IST2014-06-12T23:33:34+5:302014-06-13T00:32:36+5:30
माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली.

माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला
माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली. लावण्यात आलेला ऊस मात्र वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने जळून चालला आहे. वीज वितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
माजलगाव तालुक्यात माजलगाव सहकारी साखर कारखाना व जय महेश कारखाना हे दोन साखर कारखाने असून, सावरगाव येथे छत्रपती कारखाना देखील या हंगामामध्ये उसाचे गाळप करणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी शेतीला पाणीपुरवठा करण्याजोगी असतानाही विजेअभावी शेतातील विद्युत पंप, विंधन विहिरी बंद आहेत. वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील हजारो एकरवरील ऊस पाणी असूनही विजेअभावी जळून जात आहे.
अगोदरच मागील महिन्यात झालेल्या गारपिटीत व वादळी वाऱ्यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी कसाबसा सावरला होता. मात्र आता वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून जात आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
मागील दोन ते तीन महिन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील सहायक अभियंता पद रिक्त आहे, त्यामुळे अडचणी सोडविण्यासाठी अद्यापही सक्षम अधिकारी मिळालेला नाही.