साडेनऊ हजार कामांची माहिती संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:56 IST2017-09-16T23:56:10+5:302017-09-16T23:56:10+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या साडेनऊ हजार कामांची माहिती या कामांच्या सॅटेलाईट लोकेशन, फोटोसह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोहयोच्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे.

साडेनऊ हजार कामांची माहिती संकेतस्थळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या साडेनऊ हजार कामांची माहिती या कामांच्या सॅटेलाईट लोकेशन, फोटोसह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोहयोच्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होऊन मजुरांचे स्थलांतर थांबावे तसेच त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याबरोबरच विकासकामे मार्गी लागावीत, या उद्देशाने रोजगार हमी योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेतली जातात. परंतु, ही कामे पूर्ण होतात की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. तसेच तक्रारींची संख्याही वाढली होती. या सर्व बाबींना आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने रोहयो अंतर्गत पूर्ण केलेल्या कामांचे ‘जीओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे, त्या कामाचा फोटो तसेच त्या कामाचे वेबसाईट लोकेशन संकेतस्थळावर अपलोड केले जात आहे.
परभणी जिल्ह्यात आॅगस्ट २०१६ पासून या कामाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ३९ पॅनल तांत्रिक अधिकाºयांमार्फत पूर्ण झालेली कामे शोधून या कामांचे छायाचित्र, त्या कामाची संपूर्ण माहिती, कामावर झालेला खर्च, किती मंजुरांनी काम पूर्ण केले, याची अद्ययावत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत झालेली कामे आणि त्यावर झालेला खर्च याची माहिती सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे.
रोजगार हमी योजनेतील पूर्ण झालेली कामे आणि या कामांवर झालेल्या खर्चाची माहिती संकेतस्थळावर दिली जात असल्याने या योजनेअंतर्गत होणाºया गैरव्यवहारांनाही आळा बसणार आहे. परिणामी पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या कामांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.