एक हजार कुटुंब पूररेषेत
By Admin | Updated: August 2, 2014 01:09 IST2014-08-02T00:27:07+5:302014-08-02T01:09:42+5:30
नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़

एक हजार कुटुंब पूररेषेत
नांदेड : महापालिका हद्दीत ३५४ मीटर पातळीच्या पूररेषेत शहरातील १ हजार कुटुंब असून दरवर्षी महापालिका या कुटुंबांना नोटीस देवून आपले कर्तव्य पार पाडते़ मात्र या कुटुंबांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी अद्याप नियोजन करण्यात आले नाही़
नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठी असलेल्या १ हजार कुटुंब पूररेषेत येतात़ या कुटुंबांना प्रत्येक पावसाळ्यात महापालिका नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडते़ मात्र या भागातील नागरिकांच्या कायमस्वरूपी सुरक्षेसाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही़ २००४ मध्ये नांदेड शहराला महापुराचा तडाखा बसला होता़ यावेळी नालागुट्टाचाळ, खडकपुरा, गोवर्धनघाट, वजिराबाद, नगीनाघाट, रामघाट, शनिमंदिर, गाडीपुरा, नावघाट, वसरणी हा भाग पाण्याखाली आला होता़ त्यावेळी येथील नागरिकांचे जीव वाचविण्यात आले होते़ त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात पूररेषेतील कुटुंबांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर येत असे़ मात्र नोटीस देण्यापलीकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही़ पूररेषेत सध्या मोठ्या इमारती बांधण्यात आल्या असून या इमारतींच्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली आहे़ त्यामुळे गोरगरिबांचे घरेही या भागात झपाट्याने वाढले़ सध्या बीएसयुपी योजनेतंंर्गत गोवर्धनघाट येथे लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत उभारण्यात आली आहे़ ही इमारतही पूररेषेत येते़
शहरातील लोकवस्ती असलेला बराचसा भाग गोदावरी नदीकाठावर वसला आहे़ अतिवृष्टीनंतर शहरातील काही सखल भागात अधिक पाणी साचून कुटुंबाची जिवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पूर पातळीत ज्या कुटुंबाचे वास्तव्य आहे़ त्यांना पूर परिस्थितीच्या कालावधीत नुकसानीचा धोका संभवतो़ अशा संबंधित मालमत्ता धारकांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६३ चे उल्लंघन करून नियमितच्या पूरग्रस्त भागात अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यानूसार संबंधित कुटुंबांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून इतर सुरक्षित जागेवर स्थलांतरण करण्याच्या नोटिसा मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत बजावण्यात आल्या आहेत़
वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ४४५ कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत़ पूररेषेतील कुटुंबांना नोटीस देवून घरे रिकामे करण्याविषयी कळविले आहे़ संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़
झोन क्रं ३ इतवारा भागातील साडेतीनशे कुटुंबांना नोटिसा बजावल्याचे आहेत़ ( प्रतिनिधी)