सामूहिक विवाह सोहळ्यात राहणार एक हजार जोडपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:37 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:37:33+5:30
जालना : जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना मदत व्हावी,

सामूहिक विवाह सोहळ्यात राहणार एक हजार जोडपी
जालना : जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने जालन्यात तब्बल १००० जोडप्यांचा सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
शिवस्मारक समितीच्या वतीने १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याचे कार्याध्यक्ष कल्याणचे भाजपा आ. नरेंद्र पवार हे राहतील. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. या शुभमंगल सोहळ्यास येण्यासाठी मराठवाड्यातील वधू-वरांकडील मंडळींसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगून वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य आणि मणि व मंगळसूत्र देण्यात येणार आहे. सोहळ्यात १ लाख वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी १० एप्रिलपर्यंत राहणार असून, तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे अर्जाद्वारे नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. पत्र परिषदेस जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उद्योगपती घनश्याम गोयल, कल्याणचे आ. नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास २१ जिल्ह्यांतील दुष्काळाची दाहकता पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना जिल्हानिहाय दौरे करून अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचीच धास्ती घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसने मंत्र्यांच्या या दौऱ्याला विरोध सुरु केल्याचे टीकास्त्र भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सोडले. तथापि राष्ट्रवादीच्या या विरोधाला न जुमानता मंत्र्यांचे राज्यभर दौरे होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
४जालना शहरातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. दानवे म्हणाले की, राज्यातील सुमारे २१ जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ही दाहकता अधिक आहे. त्यामुळे दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने यंत्रणा सज्ज केली असून, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, विद्यार्थ्यांची फी माफी, कर्जाचे पुनर्गठण, मनरेगामध्ये मजुरांना कामे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही खा. दानवे म्हणाले.