‘त्या’ चार शिक्षकांचे वेतन कापणार
By Admin | Updated: July 16, 2014 01:30 IST2014-07-16T01:08:04+5:302014-07-16T01:30:41+5:30
वाळूज महानगर : जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोडून वेतन आणण्यासाठी गेलेल्या चार शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.

‘त्या’ चार शिक्षकांचे वेतन कापणार
वाळूज महानगर : जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोडून वेतन आणण्यासाठी गेलेल्या चार शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळेत १४ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास तिसरीची विद्यार्थिनी प्रियंका इंगोले खेळताना पडून बेशुद्ध पडली होती. या शाळेतील शिक्षक गायत्री परदेशी, बेबी तायडे, प्रमोद घोरपडे व एन. एस. बेग शाळेच्या वेळेत पंढरपूरला बँकेतून वेतन आणण्यासाठी गेले होते. पदाधिकाऱ्यांना समजले
होते. शाळेतील २३ शिक्षकांपैकी एकाच वेळी ९ शिक्षक गैरहजर असल्यामुळे संतप्त झालेले सरपंच योगेश दळवी, काकासाहेब दुबिले, संजय दुबिले, उत्तम मुळे, गणेश साबळे, नारायण काजळे, भास्कर दुबिले व गजानन भालेराव यांनी शाळेत येऊन पंचनामा केला होता.
चौघांचे वेतन कपात
शाळेत शिक्षक गैरहजर असल्याची माहिती आज वर्तमानपत्रांतून मिळताच गंगापूरचे गटशिक्षणाधिकारी निवृत्ती घोडके यांनी वाळूजचे केंद्रप्रमुख देवीदास सूर्यवंशी यांना शाळेत चौकशीसाठी पाठविले. योगेश दळवी, पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पा. पेरे व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोषी शिक्षकांवर कारवाई करावी; अन्यथा १६ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. सूर्यवंशी यांनी गायत्री परदेशी, बेबी तायडे, मंगल पाटील व एन.एस. बेग यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित शिक्षकांना वर्तन सुधारण्याची कडक ताकीद देण्यात आली आहे.
शिक्षकांनी वेळेवर शाळेत हजर राहावे यासाठी आज ग्रामपंचायतीने त्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविले. शाळेत शिक्षक कसे शिकवतात यावर देखरेखीसाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सरपंच योगेश दळवी यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच नजीर खान पठाण, सदस्य प्रकाश वाघचौरे, डॉ. ज्ञानेश्वर पा. नीळ उपस्थित होते.