छत्रपती संभाजीनगर : स्वयंसेवक संघ किंवा संघ परिवाराबाबत फेक नॅरेटिव्ह पसरविणारे महामूर्ख आहेत, गाढव आहेत, वाचाळवीर आहेत, असा घणाघात पद्मश्री रमेश पतंगे यांनी केला. हेतू शुद्ध असल्यामुळे संघ कार्यकर्त्यांनी संघाची बाजू लढाऊपणे मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘आम्ही संघात का आहोत' या पुस्तक प्रकाशनप्रसंगी डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संघचालक अनिल भालेराव व प्रमुख वक्ते पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य हरीश कुलकर्णी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजीनगरमधील बीड बायपास रोडवरील एमआयटीजवळील संघाच्या प्रांत कार्यालयात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यासाठी संभाजीनगर शहरातील पाचशेहून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनानंतर राजीव जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले. वैभव पांडे यांनी 'जहा दिव्यता ही जीवन है' हे वैयक्तिक गीत सादर केले. अविनाश औंढेकर यांनी आभार मानले. महर्षी पाणिनीकन्या वेद पाठशाळेतील विद्यार्थिनींनी म्हटलेल्या शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णी, विभाग संघचालक मुंजाजीराव जगाडे, विभाग सहसंघचालक कन्हैयालाल शहा आदींची उपस्थिती होती. संतोष पाठक, चेतन पगारे, अविनाश औंढेकर, योगेश भोसले, महेश कानगावकर आदींनी या समारंभाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
भारतीय संविधान सर्वश्रेष्ठपद्मश्री पतंगे पुढे म्हणाले की, प्रत्येक राष्ट्राचे अस्तित्व हे संविधानावर अवलंबून आहे. विशेषतः भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. कारण भारतीय संविधानात राष्ट्राची अनेक जीवनमूल्ये उत्तमरीतीने प्रकट झाली आहेत. भारतीय संविधान हे वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच; परंतु राष्ट्राला एकत्र बांधणारे आहे. सर्वश्रेष्ठ असणारे भारतीय संविधान बदलणे ही अशक्यप्राय गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.