‘त्या’ रिक्षाचालकास एसपीओंनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:25 IST2017-10-15T01:25:54+5:302017-10-15T01:25:54+5:30
रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ) यश आले.

‘त्या’ रिक्षाचालकास एसपीओंनी वाचविले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चार दिवसांवर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसांपासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ) यश आले. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली.
सुरेश नामदेव (वय ५०, रा. हनुमानगर, नाव बदलले आहे) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. एका मुलीचा विवाह झालेला आहे, तर दुसरी नववीत शिकत आहे. मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी जवळ दोन पैसेही नसल्याने ते रोज सकाळीच रिक्षा व्यवसायासाठी बाहेर नेत. नियमाप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्यासाठी ते रिक्षाथांब्यावर थांबतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बारा ते चौदा तास काम करूनही त्यांना म्हणावे तसे प्रवासी मिळत नव्हते. प्रवासी न मिळाल्याने त्यांना दैनंदिन रोजंदारीही काढणे दूर होत होते. त्यात त्यांची जुनी रिक्षा असल्याने त्यात नेहमी बिघाड होतो. रिक्षा दुरुस्तीवर पैसे खर्च करावे का दैनंदिन घरखर्च भागवावा, या विवंचनेत ते होते. पैसे शिल्लक राहत नसल्याने ते निराश झाल्याने त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली. पत्नीने त्यांना हिंमत दिली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृद्ध वडिलांना जेऊ घातल्यानंतर ते घराबाहेर पडले. पुंडलिकनगर येथून ते चालत-चालत थेट संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली गेले. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रेल्वेरुळावर जाऊन झोपले. साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांना ते नजरेस पडले. त्यांनी त्यांना रुळावरून उठवून त्यांची विचापूस केली तेव्हा त्यांनी रिक्षाचा व्यवसाय होत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर झोपल्याचे सांगितले.
भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी गोर्डे पाटील, अॅॅड. रामदास भोसले, नरेंद्र आडे, स्वराज गोर्डे, राहुल सोनकांबळे यांनी त्यांची समजूत काढली आणि नातेवाईकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.
रेल्वेसमोर उडी मारण्याची हिंमत झाली नाही
तत्पूर्वी त्यांच्यासमोरून तीन रेल्वेगाड्या गेल्या. प्रत्येक गाडीसमोर उडी मारून जीवनयात्रा संपवावी, या उद्देशाने ते तिकडे गेले; परंतु रेल्वेसमोर उडी मारण्याची त्यांची हिंमत झाली नाही. शेवटी त्यांनी रेल्वेरुळावर झोपण्याचा निर्णय घेतला.