‘त्या’ आश्रमशाळेत त्रुटी; समाजकल्याणचा अहवाल
By Admin | Updated: March 31, 2015 00:38 IST2015-03-31T00:03:32+5:302015-03-31T00:38:05+5:30
लातूर : लातूर तालुक्यातील काटगाव येथील सानेगुरुजी आश्रम शाळेत सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत़ वसतिगृह तसेच शाळेत या त्रुटी निदर्शनास आल्या

‘त्या’ आश्रमशाळेत त्रुटी; समाजकल्याणचा अहवाल
लातूर : लातूर तालुक्यातील काटगाव येथील सानेगुरुजी आश्रम शाळेत सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत़ वसतिगृह तसेच शाळेत या त्रुटी निदर्शनास आल्या असून, ‘त्या’ घटनेबाबतही संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी गांभीर्याने घेतले नाही़ त्यामुळे आश्रमशाळेची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, अशी प्रशासनाने नोटीस बजावली असून, समाजकल्याण संचालनालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे़ या अहवालानुसार ७ एप्रिल संस्थेची पुणे येथे सुनावणी होणार आहे़ या सुनावणीला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे़
काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व त्यातून तिचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी घडली़ याच शाळेत शिक्षक असलेल्या दोघा नराधमांनी बलात्कार केला़ त्या मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन दोन शिक्षक व वसतिगृह अधीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ दरम्यान २६ मार्च रोजी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तसेच विभागीय समाजकल्याण अधिकाऱ्यांनी शाळेची तपासणी केली़ या तपासणीत शाळेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत़ वसतिगृहातही त्रुटी आहेत़
विद्यार्थ्यांना वसतिगृहात चांगली वागणूक मिळत नाही़ तसेच सकस आहारही मिळत नाही़ एवढी गंभीर घटना घडली असताना संस्थासचिव तसेच मुख्याध्यापकांनी गांभिर्य दाखविले नाही, अशा त्रुटी तपासणी अहवालात आहेत़ हा अहवाल समाजकल्याण संचालनालयाकडे पाठविण्यात आला असून, संस्था प्रशासनाला संस्थेची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये अशी नोटीसही बजावण्यात आली आहे़ सात दिवसात खुलासा करण्याचे निर्देश सहाय्यक समाजकल्याण आयुक्त संजय दाणे यांनी नोटीसीत दिले आहेत़
काटगाव प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले सतीष मुळे व विलास गायकवाड या दोघा शिक्षकांची पोलिस कोठडीत २ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ दोघा शिक्षकांची पोलिस कोठडीची मुदत ३० मार्च रोजी संपुष्टात आल्याने त्यांना सोमवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते़दोघांच्याही पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे़ या प्रकरणी वार्डन लक्ष्मण राठोड याची पोलिस कोठडीची मुदत ३१ मार्च पर्यंत असल्याने त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले़ तसेच सानेगुरुजी आश्रमशाळेचा संस्थापक एस़डी़ चव्हाण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झालेले आहेत़ ़
या घटनेतील दोघा शिक्षकांची आरोग्याची तपासणी व डीएनए टेस्ट रविवारी करण्यात आली आहे़ लातूरच्या शासकीय रुग्णालयात डीएनए टेस्टचे कीट उपलब्ध नसल्याने हे कीट बाहेरुन मागविण्यात आले होते़ किट पोहोचताच आरोपींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले़ त्यासाठी घेतलेले रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले़