'त्या' २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुनावणी
By Admin | Updated: August 29, 2014 01:27 IST2014-08-29T00:44:48+5:302014-08-29T01:27:23+5:30
नांदेड : चुकीच्या पद्धतीने वेतनश्रेणी निश्चित करून शासनाचे २ कोटी १५ लाख ७८ हजार ७०६ रुपयांचे नुकसान करणाऱ्या जिल्ह्यातील गट ब २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी सुनावणी झाली़

'त्या' २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुनावणी
नांदेड : चुकीच्या पद्धतीने वेतनश्रेणी निश्चित करून शासनाचे २ कोटी १५ लाख ७८ हजार ७०६ रुपयांचे नुकसान करणाऱ्या जिल्ह्यातील गट ब २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी सुनावणी झाली़
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वेतननिश्चिती करून जादा वेतन देण्यात आले होते़ याबाबत औरंगाबादच्या वेतन पडताळणी पथकानेही वारंवार आक्षेप घेतले़ तसेच स्थानिक लेखा परीक्षकांनीही सन २०१०-११ च्या लेखा परीक्षणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीचे वेतन दिले जात असल्याबाबत आक्षेप घेतले होते़ असे असतानाही तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही़ मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी या प्रकरणात वसुली करण्याचे आदेश दिले आहेत़
दरम्यान त्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणी झाली़ ही सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासमोर होणार होती़ मात्र ते आज नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनीच ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली़ त्या प्रक्रियेत वेतन निश्चिती संदर्भाचा शासन निर्णय येणार असल्याचे सांगत आपल्याला दिलेली वेतनश्रेणी योग्य असल्याचा दावा केला़ मात्र शासन आदेश आल्याशिवाय सदर वेतनश्रेणी दिली जाणार नसल्याचे डॉ़ शिंदे यांनी सांगितले़ तसेच जादा प्रदान केलेले वेतन वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)