तीन लाख ८९ हजार विद्यार्थी सुटीतही घेणार खिचडीचा आस्वाद
By Admin | Updated: May 3, 2015 00:59 IST2015-05-03T00:44:04+5:302015-05-03T00:59:33+5:30
संजय तिपाले , बीड पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही नित्याप्रमाणे पोषण आहार मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या खास सोयीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे

तीन लाख ८९ हजार विद्यार्थी सुटीतही घेणार खिचडीचा आस्वाद
संजय तिपाले , बीड
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही नित्याप्रमाणे पोषण आहार मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या खास सोयीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ८९ हजार विद्यार्थी शाळांमध्ये खिचडीचा आस्वाद घेणार आहेत.
दुष्काळी परिस्थिती बिकट असलेल्या चार जिल्ह्यांमधील शाळांमध्ये २ मे ते १५ जून या सुटीच्या कालावधीतही खिचडीचे वाटप केले जाणार आहे. बीडसह अहमदनगर, पुणे, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. बीडमधील १०२१ ग्रामपंचायतीअंतर्गत १४०४ अशी सरसकट गावे टंचाईग्रस्त जाहीर झालेली आहेत. प्राथमिकच्या (पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थी) १०० तर उच्च प्राथमिकमधील (सहावी ते आठवीत शिकणारे विद्यार्थी) १५० ग्रॅम खिचडी दिली जाणार आहे.
शिक्षण उपसंचालक (प्रा.) महेश पालकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून उन्हाळी सुटीत आवश्यक असलेल्या तांदूळ पुरवठ्याची माहिती कळविण्याबाबत सूचित केले आहे.
फक्त आष्टीकडून मागणी
उन्हाळी सुटीत पुरविण्यात येणाऱ्या मोफत पोषण आहारासाठी तांदुळाची तरतूद करण्यासाठी मागणी नोंदवायची होती. शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविलेही होते;परंतु आष्टी वगळता इतर तालुक्यांतून तांदुळाची मागणी झालेली नाही. जुनाच तांदूळ शिल्लक आहे. त्यामुळे मागणी नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
नियमित तपासणी
सुटीत मोफत खिचडी पुरविण्यात येणार असल्याने दुष्काळग्रस्त बीडमध्ये विद्यार्थ्यांच्या ऐकवेळच्या जेवणाची सोय झाली आहे. या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना दिल्या आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी सांगितले. वेळोवेळी तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.