दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

By Admin | Updated: April 4, 2015 00:33 IST2015-04-04T00:31:30+5:302015-04-04T00:33:48+5:30

तुळजापूर : चैत्री पौर्णिमेच्या पूर्व संध्येला शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सुमारे दीड लाखावर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या.

Thirteen lakh devotees have taken Darshan | दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन


तुळजापूर : चैत्री पौर्णिमेच्या पूर्व संध्येला शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सुमारे दीड लाखावर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. यामुळे मंदिरातील दर्शन मंडपाचे सर्व मजले भरले होते. गोमुख व कल्लोळ तीर्थासाठी रखरखत्या उन्हातही भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
‘आई राजा उदो उदो..’ च्या जयघोषात भाविक मंदिरात दाखल होत होते. ११ वाजेनंतर अभिषेक संपल्यानंतरही दुपारी दोन वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. भाविकांच्या गर्दीने तुळजापूर शहर गजबजून गेले होते. पालिकेकडून भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम करण्यात आली होती. भाविकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असेल तेथे कापडी मंडप उभारण्यात आले होते. तर भाविकांच्या गर्दीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी १५ पोलीस अधिकारी, १६० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड असा एकूण २१५ जणांचा ताफा लावण्यात आल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी मोहन विधाते यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदरील बंदोबस्तासाठी दोन पाळीमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यातील दहा कर्मचारी मंदिर गाभाऱ्यात नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तकामी साध्या वेशातही कार्यरत आहेत.
या व्यतिरिक्त मंदिराची श्वान पथकाद्वारे नियमित तपासणी केली जात असून, आपतकालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची गाडी, प्रथमोपचाराचे केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे. यात्रा कालावधीत बाँब पथकही परिसराची कसून तपासणी करीत आहे.
बेवारस अथवा संशयित वस्तू आढळून आल्यास भाविकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त महसूल, मंदिर संस्थान, नगर परिषद व पोलीस यांच्या संयुक्त रित्या मंदिरात भाविकांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे, असेही विधाते यांनी सांगितले. (वार्ताहर)
चंद्रग्रहणामुळे तुळजाभवानीला सोवळ्यात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे ४ एप्रिल रोजी चैत्री पौर्णिमेदिनी चंद्रग्रहण असल्याने प्रशासनाने पूजेच्या वेळेत थोडे बदल केले आहेत. सायंकाळी ६ वाजता घाट देणे, पूजेस हाक मारणे व पुजारी श्री तुळजाभवानी जवळ येऊन निर्माल्य विसर्जन करणे व सोवळ्याची तयारी करणे असा कार्यक्रम असून, सायंकाळी ६.३९ वाजेपासून ते ७.१५ पर्यंत चंद्रग्रहण असल्याने या कालावधीत तुळजाभवानीस सोवळ्यात ठेवणे, त्यानंतर ७.२० वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक पूजा, रात्रौ ९ ते ९.३० या दरम्यान देवीची आरती, धुपारती व अलंकर महापूजा त्यानंतर चैत्री पोर्णिमेचा ९.३० वाजेनंतर विशेष छबिना काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी दिली.

Web Title: Thirteen lakh devotees have taken Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.