कुरेशी भागवताहेत ग्रामस्थांची तहान

By Admin | Updated: June 4, 2014 01:33 IST2014-06-04T01:10:33+5:302014-06-04T01:33:38+5:30

पारडगाव : पाणीटंचाईने कमालीचे हैराण झालेल्या पारडगाववासियांना येथील शेतकरी शेख हमजा कुरेशी यांनी स्वखर्चातून नियमितपणे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Thirst of the villagers, while sharing Kurishas | कुरेशी भागवताहेत ग्रामस्थांची तहान

कुरेशी भागवताहेत ग्रामस्थांची तहान

पारडगाव : पाणीटंचाईने कमालीचे हैराण झालेल्या पारडगाववासियांना येथील शेतकरी शेख हमजा कुरेशी यांनी स्वखर्चातून नियमितपणे पाणीपुरवठा सुरू केला आहे. पारडगाव या गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईने हैराण आहेत. या टंचाईच्या विरोधात मोठी ओरड करूनसुद्धा उपयोग होत नाही. गेल्या दोन वर्षांपासून येथील सरपंचपदाच्या संगीतखुर्चीचा खेळ सुरू आहे. दोन वर्षात दोन सरपंच लाभले. आता तिसरे सरपंच कार्यरत आहेत. परिणामी टंचाईसह अन्यप्रश्न मोठ्या प्रमाणावर रखडले आहेत. विशेषत: यावर्षी टंचाईने डोके वर काढले असून, लहान मुला-बाळांसह अबालवृद्ध नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी शेख हमजा कुरेशी यांनी या टंचाईग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचा निर्धार केला. स्वखर्चातून बोअर खोदला. त्यातून खडकपूरा व कुरेशी मोहल्ला या भागातील सर्वसामान्य ग्रामस्थांना विनामूल्य पाणीपुरवठा सुरू केला. ते दररोज २०० ते ३०० कुटुंबियांना पाणी पुरवित आहेत, तेही नियमितपणे. खडकपूरा भागात गेल्या दहावर्षापूर्वी जलवाहिनी अंथरण्यात आल्या होत्या. परंतु या जलवाहिन्यांतून थेंबभरही पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ पाण्यासाठी दररोज वणवण भटकंती करीत होते. कुरेशी यांनी याची दखल घेतली. स्वखर्चातून पाणीपुरवठा करीत या ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान या गावातील टंचाईबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर) ग्रामपंचायतीने आजपर्यंत थेंबभरही पाणीपुरवठा न केल्याने खडकपुरा भागातील ग्रामस्थात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण उन्हाळा उलटल्यानंतरसुद्धा पंचायतने लक्ष न दिल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. या गावातील पाणीपुरवठा योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. ५७ लाख रूपये खर्च करून नवीन योजना तयार करण्यात आली. मात्र, पाण्याची टाकी व गावातील जलवाहिनीला जोडणी न केल्यामुळे ही योजना बंद आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु कुरेशी यांनी पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Thirst of the villagers, while sharing Kurishas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.