विकतच्या पाण्यावरच भागतेय रहिवाशांची तहान
By Admin | Updated: April 16, 2015 01:00 IST2015-04-16T00:42:09+5:302015-04-16T01:00:15+5:30
बीड: नगरपालिके पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारंजा रोड वरिल रहिवाशांना आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. हे वास्तव चित्र बुधवारी बीड शहरात पहावयास मिळाले.

विकतच्या पाण्यावरच भागतेय रहिवाशांची तहान
बीड: नगरपालिके पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारंजा रोड वरिल रहिवाशांना आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. हे वास्तव चित्र बुधवारी बीड शहरात पहावयास मिळाले.
नगरपालिका हाकेच्या अंतरावर असूनही येथील सर्वसामान्य नागरीकांच्या पाणी टंचाईच्या वेदना ना पालिकेच्या अधिकाऱ्यांना समजतात, ना पदाधिकाऱ्यांना. गेल्या दहा दिवसांपासून कारंजा रोड परिसरात पाणी पुरवठा होत नाही. अगोदरच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायीकांचे उद्योग धोक्यात आलेले आहेत. अशा स्थितीत येथील व्यापारी, दुकानदारांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे तर महिलांना येथे असलेल्या मज्जीदच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहेत. ही स्थिती आजची नाही तर मागील अनेक महिन्यांपासून अशीच स्थिती बीड शहरात असल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्यान, या भागातील काही रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्कही केला होता. मात्र, पालिकेकडून केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही.
नागरीक स्वत:हून
‘लोकमत’ च्या कार्यालयात
मागील चार दिवसापासून बीड शहरातील पाणी टंचाईचे वास्तव स्थिती मांडण्याचे काम ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून सुरू केले आहे. आता पर्यंत शहरातील एकनाथ नगर, रामतिर्थ नगर, शनि मंदिर परिसर आदी भागातील पाण्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. शहरातील विविध भागातील महिला व नागरीक स्वत:हून ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपल्या भागातील पाणी टंचाईचे वास्तव चित्र मांडत आहेत.