तिसऱ्यांदा पेरणीची वेळ
By Admin | Updated: July 12, 2014 00:36 IST2014-07-12T00:36:17+5:302014-07-12T00:36:17+5:30
गोकुळ भवरे, किनवट जून महिन्यातील ठोक पावसानंतर केलेली पूर्ण पेरणी वाया गेली़ लगेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़

तिसऱ्यांदा पेरणीची वेळ
गोकुळ भवरे, किनवट
जून महिन्यातील ठोक पावसानंतर केलेली पूर्ण पेरणी वाया गेली़ लगेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ त्यानंतरच्या जेमतेम पावसामुळे काही प्रमाणात उगवलेली अंकुरेसुद्धा ४५ डिग्री तापमानाने होरपळून गेली़ त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यावर तिबार पेरण्यांचे संकट आले आहे.
तालुक्यात जवळपास ६३ हजार हेक्टरमध्ये जून महिन्यातच पेरण्या पूर्ण झाल्या़ तालुक्यात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड होते़ मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एका ठोक पावसामुळे येथे धूळपेरणी करण्याची प्रथा अधिक असल्याने सर्वच क्षेत्रात दुसरा पाऊस झाला असता तर ही पेरणी जमेची बाजू झाली असती, परंतु तसे न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होेते़ त्यांनी बिनबोभाट दुबार पेरण्या करूनही टाकल्या़ परंतु उन्हाळ्याप्रमाणे तापमान झाल्याने पेरणीसुद्धा वाया गेली़ आता तिबार पेरणीसाठी बियाणे आणायचे तरी कशाने व कोठून? या विवंचनेत संपूर्ण शेतीवर्ग सापडला आहे़ त्यातूनच काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या़
मंत्र्यांनी स्थानिक प्रशासनास पंचनामे करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे कळविले़ तसे दुबार पेरणीच्या नुकसानीचे पाहणी पत्रके वरिष्ठांना पाठविले़ नुकसानीचे आकडे बघून जिल्हास्तरीय बागायती लोकप्रतिनिधींना किनवटचा द्वेश आला की काय, अशा स्थितीत नुकसानीच्या पाहणीपत्रकाचे दुसऱ्या यंत्रणेमार्फत फेरतपासणी करण्याचे निर्देश दिल्या गेले़ त्यामुळे शेतकरी मात्र याकडे मोडीत मदतीपासून दुरावला गेला आहे़ परिणामी तिबार पेरणी लांबण्याची चिन्हे दिसत आहे़ संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी पीककर्ज माफ करून नव्याने पीककर्ज उपलब्ध करण्याची मागणी होत आहे़
मानवतावादी संघटन समितीने ५ जुलै रोजी तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले़ त्यानंतर ८ जुलै रोजी भाजपाकडून धरणे आंदोलन करण्यात आले़
तिबार पेरणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत व पीककर्ज संपूर्ण माफ करून नव्याने पीककर्जाचे वितरण, जनावरांसाठी चाराडेपो, पिण्याच्या पाण्याची नव्याने यंत्रणा उभारणे या विषयांना घेऊन माकपचे कॉ़अर्जुन आडे, भारिप बमसंचे सुरेश जाधव, संविधान पार्टीचे मिलिंद धावारे, शिवसेनेचे सुरज सातुरवार, सुनील पाटील, भाकपाचे गंगारेड्डी बैनमवार यांच्यासह सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल, असे वातावरण सध्या होत आहे़
पहिल्या पेरणीपोटी हेक्टरी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, दुबार पेरणीसाठी ४ हजार रुपये असा एकूण ९ हजार रुपये खर्च केला़ तो वाया गेला़ आता तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही़ तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या अस्मानी संकटातून गतवर्षी अतिवृष्टी व गारपीट आणि यावर्षी कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे़
याविषयी शासनास पूर्वकल्पना दिली़ त्यातूनच नुकसानीची पाहणी सुरू आहे़ यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आ़ प्रदीप नाईक यांनी दिली़
पावसासाठी कंधारात विठोबाला साकडे
कंधार: पावसाअभावी शेतकरी, नागरिकांच्या मनाची मोठी घालमेल चालू आहे. त्यामुळे पाणी पडू दे अन् शिवार फुलू दे असे भाविकांनी शहर व परिसरात विठूरायाला साकडे घालत पूजाअर्चा केली. भर पावसात आषाढी एकादशी साजरी करण्याची मनोकामना भाविकांनी बाळगली होती. हिरवा शिवार, पावसाची रिमझिम, रस्त्यावर चिखल, शेतात पिकांची मशागत करतानाचे चित्र, गुराढोरांना मिळणारे हिरवे गवत, बाजारात शेतकऱ्यांची गर्दी आदी चित्र लोप पावले आहे. आकाशाकडे पाहून पाणी पडण्याच्या आशेने शेतकरी व्याकुळ झाला आहे. एकीकडे पेरण्यासाठी झालेली बी-बियाणांची व रासायनिक खताची खरेदी, त्यातच मुला-मुलींना लागणारे शैक्षणिक साहित्य खरेदी आदीने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. ८ जुलै रोजी हलक्या पावसाने हजेरी लावली. कंधार १८, कुरुळा ८, उस्माननगर ४०, पेठवडज १८, फुलवळ १ व बारुळ निरंक अशी नोंद झाली. पेरणीयोग्य पावसाची हजेरी नसल्याने आभाळाकडे शेतकरी टक लावून थकला आहे. निसर्गाला साद घालून चिंतित झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगालाच आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत पावसासाठी साकडे घातले. पूजाअर्चा, भजन, कीर्तन, मृदंग, टाळाच्या गजरात विठ्ठलाच्या जयघोषात भाविकांनी आराधना केली. बालगोपाल, स्त्री-पुरुष, अबालवृद्ध आदींनी शहरात माणिकगडावरील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)