तिसऱ्या दिवशीही ‘वरुण’कृपा
By Admin | Updated: July 23, 2016 01:07 IST2016-07-23T00:31:31+5:302016-07-23T01:07:24+5:30
बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत

तिसऱ्या दिवशीही ‘वरुण’कृपा
बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत. असे असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने सर्वच्या सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाऊस आहे पण पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात २४२.३ मि.मी पावसाची नोंद शुक्रवारपर्यंत झाली आहे.
खरीपपूर्व मशागतीनंतरच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी टिफणी उचलल्या होत्या. पावसात सातत्य न राहिल्याने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पेरण्या झाल्या होत्या. सुरवातीच्या केवह शिरूरकासार आणि पाटोदा तालुक्यातचसरासरी क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. १५ जून नंतर झालेल्या पावसावर खरीपातील पेरण्यांनी वेग घेतला होता. नंतरच्या महिन्याभरातच सरासरी खरीप क्षेत्राचा टप्पा ओलांडत १०६ टक्यावर पेरण्या झाल्या होत्या. गतआठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. याकाळात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकती घेतली असून खाताचा मारा करताच पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील सर्व पिके सध्या फोफावत आहेत. पिकांकरिता सध्याचे वातावरण पोषक असून पावसामुळे पिकांना कोणत्याही रोगराईचा धोका नसल्याचे कृषी उपसंचालक बी.एम.गायकवाड यांनी सांगितले आहे. असे असले तरी अर्धा पावसाळा उलटण्याची वेळ आली तरी जिल्ह्यातील १४४ प्रकल्प कोरडेच आहेत. सरासरीच्या ३१ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेलाच नाही. सध्याचा पेंडओलता पाऊस पिकाला चांगला असला दमदार पावसाची शेतकऱ्यांबरोब प्रशासनालाही प्रतिक्षा आहे. आजघडीला जिल्ह्यात साडेतीनशे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. (प्रतिनिधी)