शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना
By Admin | Updated: July 19, 2014 00:39 IST2014-07-19T00:15:50+5:302014-07-19T00:39:20+5:30
सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे.

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना
सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे. त्यातच मे महिन्यात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी लावलेल्या कापसांच्या झाडांवर लाल्या आल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत़
गुगळीधामणगाव परिसरात एका नामांकित सिड्स कंपनीचे बियाणे लावल्या नंतर कापसाची झाडे सुकू लागली व लाल पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांना ती झाडे उपटून टाकण्या शिवाय पर्याय राहिला नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी कृषी कार्यालय गाठले़ त्यानंतर शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, पर्यवेक्षक दत्तराव बोराडे यांनी गुगळी धामणगाव परिसरातील कल्याण डख, भगवान डख, गणेश लोमटे, नारायण काळे, सुशील कुलकर्णी यांच्या शेतावर जावून झाडांची पाहणी केली आहे़ परंतु, मोठया प्रमाणावर झालेले नुकसान कसे भरून येणार हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ गुगळीधामणगाव परिसरात मोठया प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मे महिन्यात कापसाची लागवड करण्यात आली़
कापसाची झाडे जोमात आली परंतु, अचानक कापसाची झाडे लाल पडून त्याची वाढ खुंटली व ती झाडे जागेवरच सुकू लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उदभवला आहे़
मे महिन्यात लागवड केलेल्या कापसावर महागडी रासायनिक खते व फ वारणी शेतकऱ्यांनी केली़ दोन वेळा निंदणी करून रात्रंदिवस झाडांची जोपासना केली़ परंतु, अचानकच ही झाडे लाल पडल्यामुळे शेतकरी चक्रावून गेले़ त्यामुळे बियाणे बोगस असल्याचे शेतकरी सांगत आहेत़ जवळपास एका कापसाच्या बॅग मागे या शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाचा खर्च आला आहे़ लाल झालेल्या झाडांना शेतकऱ्यांनी उपटून टाकले. परंतु, आता नवीन पेरणी करून हाती काय लागणार हा ही प्रश्न आहे़ त्यामुळे संबंधितांवर विरूध्द कार्यवाही करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
कृषी विभागाने केली पाहणी
गुगळीधामणगाव परिसरात एका कंपनीच्या कापसाची झाडे लाल पडली व वाढ खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे गुरूवारी या परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे धाव घेतली़ शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी शेतावर जावून परिस्थितीची पाहणी केली़ शेतकऱ्यांनी बियाणे बोगस असल्याची तोंडी तक्रार कृषी विभागाकडे केली आहे़ याबाबतचा सर्व अहवाल जिल्हा तक्रार समितीकडे कृषी विभाग पाठवणार आहे़ त्यानंतरच बियाणे बोगस आहे की वातावरणाचा परिणाम हे स्पष्ट होणार आहे़ परंतु, मोठया प्रमाणावर झालेली नुकसान भरून कशी येणार हा ही प्रश्न आहे़