तेर ग्रामस्थांना टंचाईच्या झळा
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-23T00:08:20+5:302014-07-23T00:32:50+5:30
तेर : पावसाने ओढ दिल्याने तेर (ता़ उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़

तेर ग्रामस्थांना टंचाईच्या झळा
तेर : पावसाने ओढ दिल्याने तेर (ता़ उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांनाही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ त्यात जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडल्याने अर्ध्याहून अधिक ग्रामस्थांना येणारे पाणीही मुबलक प्रमाणात मिळत नाही़ शिवाय येथील झोपडपट्टी भाग व पेठ परिसरातील गोदावरी भागात पाणीटंचाई भीषण झाली आहे़
येथून नजीकच असलेल्या तेरणा प्रकल्पातून तेरसह ढोकी, येडशी, तडवळा गावास पाणीपुरवठा करण्यासाठी सन २००६ मध्ये प्राधिकरण अंतर्गत योजना सुरू करण्यात आली आहे़ जवळपास १६ कोटी रूपये खर्चाची ही योजना या गावातील ग्रामस्थांसाठी पाणी कमी अन् डोकेदुखी अधिक अशीच झाली आहे़ तेर गावास दोन हातपंप, एक कूपनलिका, आडातील पाणी आदींद्वारेही पाणीपुरवठा होतो़ मात्र, या जलस्त्रोतातील पाणीपातळीतही घट झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ झोपडपट्टी भागात राहणाऱ्या जवळपास ५० कुटुंबांची परवड गत अनेक वर्षापासून सुरू आहे़ प्राधिकरणने अद्याप या भागात पाईपलाईन केली नसल्याने पाण्यासाठी बारमाही भटकंती होत आहे़ त्यामुळे कधी उस्मानाबाद पाईपलाईनचे, कधी शाळेतील कुपनलिकेचे तर कधी शेतातील पाणी आणण्यासाठी या परिसरातील नागरिकांची भटकंती सुरू असते़ या झोपडपट्टीजवळच प्राधिकरणचा जलकुंभ आहे़ मात्र, याचा लाभ झोपडपट्टी वासियांना होताना दिसत नाही़ (वार्ताहर)
शाळेसह शेतकऱ्यांचा आधार
या परिसरातील नागरिक शाळेची कूपनलिका व माळी यांच्या शेतातील विहिरीचे पाणी भरून आपली गरज भागवत आहेत़ विजेच्या लपंडावामुळे आपापली कामे बाजूला ठेवून अगोदर पाणी भरावे लागत आहे़ त्यामुळे या परिसरात पाईपलाईन करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़
लवकरच पाईपलाईन
तेर येथील झोपडपट्टी परिसरातील पाईपलाईनबाबत जीवन प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, लवकरच पाईपलाईनचे इस्टिमेंट सादर करण्यात येणार आहे़ निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़
अधिग्रहणाचे तीन प्रस्ताव
गावातील जलस्त्रोतांची अटलेली पाणीपातळी व निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे दोन कूपनलिका, एक विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविला आहे़ पंचायत समितीने सदरील प्रस्ताव तत्काळ मंजूर करून गावातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी होत आहे़