चोर भाच्याचा गुरू निघाला मामा!
By Admin | Updated: September 4, 2014 00:56 IST2014-09-04T00:33:53+5:302014-09-04T00:56:36+5:30
औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अल्पवयीन चोरट्याचा गुरू त्याचा सख्खा मामाच निघाला.

चोर भाच्याचा गुरू निघाला मामा!
औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अल्पवयीन चोरट्याचा गुरू त्याचा सख्खा मामाच निघाला. या मामा-भाच्याच्या जोडीने शहरात अनेक चोऱ्या केल्या असून नक्षत्रवाडी परिसरातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी या मामालाही अटक केली.
शरद जगन्नाथ बावस्कर (२९, रा. नक्षत्रपार्क) असे या आरोपी मामाचे नाव आहे. घटनेबाबत पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पैठण रोडवर शरदच्या १७ वर्षीय भाच्याला चोरीच्या मोटारसायकलसह अटक करण्यात आली होती.
तपासात ही दुचाकी आपण मामा शरदच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी शरदचा शोध सुरू केला. अखेर काल मध्यरात्री तो नक्षत्रपार्क येथे आपल्या घरी आल्याची माहिती मिळाली. लगेच फौजदार केदारे, सहायक फौजदार बुट्टे, देशराज मोरे, राजेंद्र साळुंके, विनोद जाधव यांनी शरदचे घर गाठले. तेथे तो सापडला. त्यावेळी त्याच्या घरात एक संगणक, एलईडी, चांदीचे दागिने सापडले. ‘खाक्या’ दाखविताच ‘भाच्यासह मी नक्षत्रपार्कमधीलच रहिवासी असलेल्या सचिन मोतीवार यांचे नुकतेच घर फोडले होते. त्या चोरीतील हा ऐवज आहे’ अशी शरदने कबुली दिली. या चोरीप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. भाच्याच्या मदतीने आपण आणखी काही चोऱ्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. या आरोपीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी व्यक्त केली.
दोघेही घरातून हाकललेले !
आरोपी शरद आणि त्याचा भाचा या दोघांनाही घरच्यांनी हाकलून दिलेले आहे. शरदचे आई-वडील कांचनवाडी परिसरातील हिंदुस्थान आवासमध्ये राहतात. घरचे येऊ देत नाहीत म्हणून तो एका महिलेसोबत भाड्याची खोली घेऊन नक्षत्रपार्कमध्ये राहतो.
त्याचा चोर भाचाही विष्णुनगरात राहतो; परंतु घरचे येऊ देत नाहीत म्हणून गेल्या काही दिवसांपासून तोही मामाकडे राहायचा. या दोघांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे घरचे त्यांना जवळ करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.