थेरगावात चोरट्यांचा धूमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:07+5:302021-05-18T04:05:07+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील थेरगावात रविवारी रात्री उशिरापर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घालून पाच ठिकाणी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. यात ...

थेरगावात चोरट्यांचा धूमाकूळ
पाचोड : पैठण तालुक्यातील थेरगावात रविवारी रात्री उशिरापर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घालून पाच ठिकाणी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. यात हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आजूूबाजूच्या घराला कड्या लावून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिन्यावर डल्ला मारला आहे.
पाचोडपासून जवळ असलेल्या थेरगावात रविवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गावकरी घरांच्या बाहेर अंगणात झोपत असतात. याचाच फायदा घेत, चोरट्यांनी गावातील काकासाहेब पिंपळे यांच्या घरातून पाच हजार, काकासाहेब वाहुळे यांच्या घरातून २९ हजार रुपये, बाबुलाल पठाण यांच्या घरातील पेटीतून दोन हजार रुपये लंपास केले, तर विजय सरोदे यांच्या घरातून सोन्याची एक तोळ्यांची पोत चोरून नेली. अशोक निर्मळ यांच्या खळ्यात जाऊन कुलूप तोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने तेथून त्यांनी पळ काढला. जवळपास रविवारी रात्री दोन तास चोरट्यांनी हा थरार मांडला असल्याचे नागरिकांनी सांगितले. ज्यांच्या घरात चोरीच्या घटना घडल्या, त्यांनी मात्र पोलीस ठाण्यात अद्याप फिर्याद दिली नव्हती, परंतु थेरगावात या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.