देवीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

By Admin | Updated: March 19, 2015 23:55 IST2015-03-19T23:35:36+5:302015-03-19T23:55:40+5:30

पाटण येथील घटना : चांदीच्या मूर्तीसह, मुखवटे, मंगळसूत्र असा दीड लाखाचा ऐवज लंपास

Thieves on the statue of Goddess | देवीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

देवीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

पाटण : पाटणचे ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारून देवीची चांदीच्या मूर्तीसह सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. पोलीस ठाण्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
लक्ष्मीदेवीच्या मंदिरात रात्रीच्या वेळी घुसून चोरट्यांनी चांदीच्या मूर्तीसह देवीची मुखवटे, दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. दरम्यान, या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानाने मोरे गल्लीपर्यंत माग काढला. मंदिर परिसरात
ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, कॅमेरे सतत चालू नसतात.मंदिराचे पुजारी सागर गुरव (वय २७) हे मंदिराशेजारीच राहतात. त्यांनी पाटण पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याचे माझ्या लक्षात आले. चोरट्यांनी साडेतीन किलो वजनाची चांदीची मूर्ती तसेच इतर दोन चांदीचे मुखवट, भैरोबा देवाचा मुखवटा व देवीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे. (प्रतिनिधी)


काही दिवसांपूर्वीच बसविलेली चांदीची मूर्ती
लक्ष्मी मंदिर उंच माळावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लोकवस्ती आहे. मात्र, मागील बाजूस मोकळा परिसर आहे. मंदिरात काही दिवसांपूर्वीच देवीच्या चांदीच्या मूर्ती बसविल्या होत्या. चोरट्यांनी लक्ष ठेवून गाभाऱ्याचा कडीकोयंडा ड्रील मशीनच्या साह्याने तोडून चोरी केली असल्याची चर्चा आहे.


हे मंदिर उंच ठिकाणी आहे. मंदिराच्या सुरक्षेची पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच ग्रामस्थांचीही आहे. या चोरीत परिसरातील कोणा व्यक्तीचा किंवा बाहेरच्या कोणत्या टोळीचा हात आहे का, याचा तपास करणार आहे. या चोरीचा लवकरच छडा लावू.
- मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक


ग्रामस्थांनी केला निषेध
चोरांच्या नजरेतून आता देवही सुटले नाहीत. गावातील लक्ष्मीदेवीची चांदीची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेचा पाटण ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. तसेच पोलिसांनी या चोरीचा छडा लावून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Web Title: Thieves on the statue of Goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.