चोर-पोलिसांत थरार...

By Admin | Updated: December 28, 2015 23:47 IST2015-12-28T23:41:30+5:302015-12-28T23:47:52+5:30

औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीवर गस्तीवरील पोलिसांची नजर पडली. पोलिसांना पाहून ते तीन चोरटे बँकेच्या पहिल्या मजल्यावरून

Thieves-police thunder | चोर-पोलिसांत थरार...

चोर-पोलिसांत थरार...


औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीवर गस्तीवरील पोलिसांची नजर पडली. पोलिसांना पाहून ते तीन चोरटे बँकेच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. एक चोरटा पाठलागादरम्यान पोलिसांच्या हाती लागला. दुसरा मात्र तिसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या पाण्याच्या टाकीमागे जाऊन लपला. याप्रसंगी पोलिसांनी बंदूक रोखल्यानंतर तो अखेर पोलिसांना शरण आला. जालना रोडवरील आकाशवाणी चौकात असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद (एसबीएच)च्या इमारतीत हा थरार सोमवारी रात्री २.३० ते ३.०० वाजेदरम्यान घडला.
बंटा राजेश चौधरी (२६) आणि भोला रोहित चंमार (२१, दोघेही ह.मु. लोटाकारंजा, रा. भांडूप, मुंबई), असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, पीसीआर मोबाईल कार क्रमांक-२ मधील पथक पोलीस कर्मचारी भगवान शिलोटे, बीडकर, जाधव, चार्ली पोलीस कर्मचारी रात्री २.३० वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातून जात असताना त्यांना या चौकातील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या इमारतीत काही जण संशयितरीत्या उभे असल्याचे दिसले. याप्रसंगी पोलिसांनी आपली कार एसबीएच एटीएम सेंटरच्या दिशेने नेताच, पोलिसांना पाहून एटीएमबाहेर उभे असलेले तीन आरोपी ३० फूट उंचीवरून उड्या मारून पळून गेले, तर एटीएम फोडत असलेले दोन आरोपी एसबीएच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या दिशेने जाऊ लागले. याप्रसंगी एका जणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर अन्य एक आरोपी इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीमागे जाऊन लपला.
पाठलाग करीत पोलीस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा तो पाण्याच्या टाकीमागे लपलेला असल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलीस नाईक हवालदार भगवान शिलोटे यांनी त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, तो येत नसल्याचे पाहून शेवटी शेलोटे यांनी त्याच्या दिशेने बंदूक रोखली आणि शरण ये; अन्यथा तुला गोळ्या घालीन, असा इशाराच दिला. तेव्हा कुठे तो पाण्याच्या टाकीमागून पुढे येत पोलिसांना शरण आला. सुमारे पाऊण तास हा थरार सुरू होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुखदेव चौघुले, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, उपनिरीक्षक तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक विलास ठाकरे पुढील तपास करीत आहेत.
मुक्काम औरंगाबादेत
पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना जिन्सी ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
पीयूपीचे काम करीत असल्याचे ते सांगतात. मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या या आरोपींकडे भांडूप (मुंबई)मधील रहिवासी पुरावा आहे, तर शहरातील लोटाकारंजा भागात रूम भाड्याने करून राहत असल्याचे समोर आले.
या आरोपींनी एटीएम फोडणे, दरोडे टाकण्यासारखे गंभीर गुन्हे केले असावेत, असा पोलिसांना संशय असून, त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पो.नि. कांबळे यांनी सांगितले.
आरोपी बंटा चौधरी याची अंगझडती पोलिसांनी घेतली. याप्रसंगी त्याच्याजवळील बॅगमध्ये विविध कंपन्यांच्या सिगारेट, ४ हजार ९२० रुपये रोख, कार्बन कंपनीचा मोबाईल, चिल्लर नाणे आणि लोखंडी कटर मिळाले, तर आरोपी भोलाकडे १ हजार ८९ रुपये रोख, तसेच विविध कंपन्यांच्या सिगारेटची पाकिटे, दोन शर्ट, दोन जिन्सी पॅन्ट आढळल्या. आरोपींकडील हा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Thieves-police thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.