उत्खननातील पुरातन वस्तंूवर चोरट्यांचा डोळा
By Admin | Updated: February 22, 2015 00:36 IST2015-02-22T00:30:08+5:302015-02-22T00:36:56+5:30
तेर : तेरच्या मातीत दडलेला सातवाहनकालीन इतिहास शोधून काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे़ या उत्खननात अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत़

उत्खननातील पुरातन वस्तंूवर चोरट्यांचा डोळा
तेर : तेरच्या मातीत दडलेला सातवाहनकालीन इतिहास शोधून काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे़ या उत्खननात अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत़ मात्र, कोट टेकडी भागात शुक्रवारी सापडलेले एक भांडे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले़ तर दुसरीकडे खोदकाम सुरू असलेल्या भागातच अनेक लोटाबहाद्दरांनी घाण करण्याचा प्रकार सुरूच ठेवले आहे़ वारंवार स्वच्छतेचे आवाहन करूनही लोहाटाबहाद्दर ऐकत नसल्याने पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी हैैराण झाले आहेत़
तेरच्या भूमिला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मोठा लाभला आहे़ सातवाहन काळात तेरमधून परराष्ट्राशी व्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते़ तेरच्या परिसरात यापूर्वी करण्यात आलेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तू आढळल्या आहेत़ येथील रामलिंगअप्पा लामतुरे पुरातण वस्तू संग्राहलयाला विदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक भेट देतात़ तेरच्या मातीत दडलेला असाच इतिहास शोधून काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून २८ जानेवारी पासून खोदकामास सुरूवात करण्यात आली आहे़ खोदकाम सुरू करण्यापूर्वी व खोदकाम सुरू झाल्यानंतर या परिसरात लोटा बहाद्दरांनी घाण करू नये, ग्रामस्थांनी या कामी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले होते़ मात्र, काही लोटाबहाद्दरांनी नित्यनियमाने खोदकाम सुरू असलेल्या भागातच शौचास जाण्याचा प्रकार सुरू ठेवला आहे़ त्यामुळे खोदकाम करताना अधिकाऱ्यांसह कामगारांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़ दुर्गंधी अधिक असल्याने अक्षरश: तोंडाला रूमाल बांधून काम करण्याची वेळ अधिकाऱ्यांसह कामगारांवर आली आहे़ विशेष म्हणजे खोदकामात आढळलेल्या वस्तू येथील रामलिंगअप्पा लामतुरे पुरातन वस्तू संग्राहलयात ठेवण्यात आल्या आहेत़ या परिसरातही काही महाभागांनी अस्वच्छता करण्याचा प्रकार सुरू ठेवला आहे़ त्यातच शुक्रवारी सापडलेल्या खापराच्या दोन भांड्यापैैकी एक भांडे चोरीस गेल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे़ कोट टेकडी भागात शुक्रवारी सापडलेली दोन भांडी अभ्यासासाठी चित्र रेखणे व इतर कामासाठी ठेवण्यात आली होती़ मात्र, काही चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला चकवा देवून यातील एक भांडे चोरून नेले आहे़ हा प्रकार समोर आल्यानंतर पुरातत्त्व अधिकारी संतप्त झाले आहेत़ (प्रतिनिधी)