अनुपम हाऊसिंग सोसायटीतील २५ वर्षे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:14+5:302020-12-17T04:31:14+5:30

औरंगाबाद : श्रेयनगर परिसरातील अनुपम हौसिंग सोसायटीमधील २५ वर्षांचे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी पहाटे ...

Thieves cut down a 25-year-old sandalwood tree in Anupam Housing Society | अनुपम हाऊसिंग सोसायटीतील २५ वर्षे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले

अनुपम हाऊसिंग सोसायटीतील २५ वर्षे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले

औरंगाबाद : श्रेयनगर परिसरातील अनुपम हौसिंग सोसायटीमधील २५ वर्षांचे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी पहाटे घडली. या झाडावर अनेक वर्षांपासून राहणाऱ्या शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट थांबल्यामुळे रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.

पुंड यांनी २५ वर्षांपूर्वी अंगणात चंदनाचे झाड लावले होते. गेल्या काही दिवसांपासून पुंड कुटुंब मुंबईला नातेवाईकांकडे गेले आहे. चोरट्यांनी हीच संधी साधून रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चंदनाचे झाड तोडले. हे मोठे झाड खाली पडण्याचा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजाऱ्यांना जाग आली. त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र, अवघ्या १० मिनिटांत चोरट्यांनी चंदनाच्या झाडाचे सुमारे १२ ते १३ फूट खोड कापून नेले. या घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस येइपर्यंत चोरटे चंदनाचे लाकूड घेऊन पसार झाले. उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, घटना समजल्यावर आम्ही घरमालकांशी संपर्क केला. मात्र, ते मुंबईला असल्यामुळे तक्रारदार देण्यासाठी अद्याप ठाण्यात आले नाहीत. असे असले तरी आम्ही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

===============

कोट

पक्ष्यांचा किलबिलाट थांबला

चंदनाचे हे झाड उंच आणि दाट पालवीचे होते. यामुळे झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. पक्ष्यांचा किलबिलाट सकाळपासून रात्रीपर्यंत कानावर पडत असे. चोरट्यांनी झाड कापून नेल्यापासून झाडाच्या फांद्या अंगणात आणि भिंतीवर पडून आहेत. झाड तोडल्यापासून पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आहे. पोलिसांनी आरोपींवर तातडीने कारवाई करावी.

- अनिल बुराडे, अनुपम हाऊसिंग सोसायटी.

दीड किलोमीटरचे अंतर अन् तेरा फुटाचे खोड

घटनास्थळापासून उस्मानपुरा पोलीस ठाणे केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. १३ फूट लांबीचे जाडजूड खोड चोरटे सहज घेऊन जाईपर्यंत गुळगुळीत रस्त्यावरून पोलिसांना पोहोचता आले नाही, याचे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Thieves cut down a 25-year-old sandalwood tree in Anupam Housing Society