शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...
By Admin | Updated: April 2, 2017 23:38 IST2017-04-02T23:35:06+5:302017-04-02T23:38:56+5:30
उस्मानाबाद : शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़

शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...
उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून शहरात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील आठवडी बाजार परिसरात नगर पालिकेच्या गाळ्यांमध्ये अनेक व्यवसायिकांचे दुकाने आहेत़ शहरातील गाझीपुरा भागात राहणारे अल्ताफ जमालोद्दीन शेख यांचेही या भागातील कॉम्प्लेक्समध्ये गाळा क्रमांक दोन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ त्यांचा भाऊ आशपाक शेख हा १ एप्रिल रोजी रात्री दुकान बंद करून गेला होता़ सकाळच्या सुमारास शेख यांचे दुकान चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले़ शेख यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील कॉपर वायरचे ३७ हजार ८४० रूपयांचे ८ बॉक्स, दुसऱ्या कंपनीच्या कॉपर वायरीचे २५ हजार २०० रूपयांचे ३ बॉक्स, १८ हजाराचे भंगार वायर, ७६०० रूपयांच्या ४० बुशिंग व रोख ४०० रूपये असा जवळपास ९८ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले़ तर शेख यांच्या दुकानाशेजारी असलेले अहमद हुसेन शेख यांचे एच़इंजिनिअरिंग दुकानही चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले़ शेख यांच्या दुकानातून १० हजार ८०० रूपयांचे कॉपर वायरचे बॉक्स, १४ हजार ८५० रूपयांचे तीन बॉक्स, ५ हजार ४०० रूपयांचा एक बॉक्स, १३ हजार ५०० रूपयांचे भंगार वायर असा जवळपास ४४ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर याच भागात असलेले अमोल प्रकाश शेरकर यांचे किरणा दुकानही फोडल्याचे समोर आले़
शेरकर यांच्या दुकानातील ३७०० रूपयांचा मुगदाळीचा एक कट्टा, ३२०० रूपयांचे तांदळाचे दोन कट्टे, ७७०० रूपयांचे तेलाचे सात डब्बे, सहा हजार रूपयांचे सूर्यफुलाचे सात डब्बे, ११२० रूपये किंमतीचे चहापत्तीचे १४ बॉक्स, २४०० रूपयांचा शाबुदान्याचा एक कट्टा, गल्ल्यातील रोख २४०० रूपये असा जवळपास २९ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याने परिसरातील व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे़
घटनेनंतर स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोनि डी़एम़शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ (प्रतिनिधी)