चापानेर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: July 7, 2014 00:42 IST2014-07-07T00:26:50+5:302014-07-07T00:42:14+5:30
चापानेर : चापानेर परिसरात दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतवस्त्यांवरील घरात घुसून सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

चापानेर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
चापानेर : चापानेर परिसरातील हसनखेडा व जवळी खुर्द शिव वस्त्यावर दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतवस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या घरात घुसून सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. चोरट्यांच्या दहशतीचा शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे.
पाऊस नसल्यामुळे सध्या वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी घराच्या बाहेर झोपत असल्याचा फायदा शेतकऱ्यांनी उचलला. चापानेर शिवारातील विलास शंकर हिलाले हे त्यांच्या कुटुंबासह घराच्या बाहेर झोपले होते. घराची कडी उघडून चोरट्यांनी दीड तोळे सोने, रोख रक्कम वीस हजार रुपये व भारतीय स्टेट बँकेचे एटीएम कार्ड घेऊन पोबारा केला. चोरटे चोरी करून गेले तरी त्याची खबर त्यांना लागली नाही.
अशीच चोरी त्यांच्या घरापासून पाचशे फूट अंतरावरील रामहरी कारभारी पवार हे घराच्या बाहेर झोपलेले होते. चोरट्यांनी घराची कडी उघडून कपाट, पेटी उघडून तीन तोळे सोने व रोख रक्कम सहा हजार रुपये घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांकडे कुत्रे असतानाही त्यांनी ओरड केली नाही किंवा कुणालाही जाग आली नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाळू बाबुराव दरेकर, अनिल सीताराम माळी यांच्या शेतात वळविला. त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. त्यानंतर हसनखेडा येथील दिलीप सावळीराम दळवी यांच्या शेतवस्तीवरील शेतात चोरी करीत असताना घरातील महिलेला जाग आल्याने तिने ओरड केल्याने चोरटे पळून गेले. चोरट्यांनी कोणाला मारहाणही केली नाही. शेतकरी थोडा जरी आवाज झाला किंवा कुत्र्यांनाही त्याची चाहूल लागली की जागी होतात; मात्र या चोऱ्या होत असताना कुठलाही गोंधळ किंवा चाहूल लागली नाही, याचे आश्चर्य शेतकरी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
चोरट्यांच्या धुमाकुळीने शेतवस्त्यावरील राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. या घटना कन्नड व देवगाव रंगारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या. आठ दिवसांपूर्वी विटा येथून बैल, तर चापानेर बसस्थानकावरील देवीदास भाडाईत यांच्या किराणा दुकानासमोरून दोनशे लिटर भरलेली गोडेतेलाची टाकी चोरी झाली होती. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी चापानेरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.