राजे संभाजी कॉलनीत घरफोडून चोरट्यांनी पळविले १२ तोळ्यांचे दागिने अन्‌ रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:12+5:302020-12-17T04:30:12+5:30

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, हर्सुल परिसरातील राजे संभाजी कॉलनीतील रहिवासी संतोष लक्ष्मण जाधव हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. ...

Thieves break into house in Raje Sambhaji Colony and snatch 12 weights of jewelery and cash | राजे संभाजी कॉलनीत घरफोडून चोरट्यांनी पळविले १२ तोळ्यांचे दागिने अन्‌ रोकड

राजे संभाजी कॉलनीत घरफोडून चोरट्यांनी पळविले १२ तोळ्यांचे दागिने अन्‌ रोकड

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, हर्सुल परिसरातील राजे संभाजी कॉलनीतील रहिवासी संतोष लक्ष्मण जाधव हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या लहान भावाचे निधन झाल्यापासून आजारी आईची जबाबदारी संतोष यांच्यावर आली आहे. त्यांच्या आईचे नुकतेच ऑपरेशन झाल्याने जाधव पती पत्नी हे दर शनिवारी आणि रविवारी सांजुळ (ता. फुलंब्री) या गावी जातात. १२ डिसेंबर रोजी शनिवारी जाधव हे पत्नी आणि दोन मुलांसह सांजुळ येथे गेले होते. घराची सुरक्षित आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी संतोष हे रविवारी दुपारी त्यांच्या घरी येऊन गेले होते.

त्यानंतर रात्री त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्याचे घर फोडण्याचा बेत रचला. सर्वप्रथम चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर छताकडे वळविली. यानंतर दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे २ तोळ्याचे नेकलेस, ४ तोळ्याचे मोठे गंठण, एकदाणी, ३ अंगठ्या, १ तोळ्याचे कानातले झुंबर, अडीच तोळ्याचे लॉकेट, लहान मुलाच्या कानातील बाळ्या, २ नथ , मंगळसुत्राची जोड आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेले. आज सकाळी जाधव यांच्या घराचा कोंडा तुटलेला दिसल्याने शेजारील म्हस्के यांनी या घटनेची माहिती त्यांना फोनवरून दिली. जाधव कुटुंबाने तत्काळ औरंगाबाद गाठले. तेव्हा कपाटातील कपडे आणि अन्य वस्तू पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले आणि लॉकरमधील दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसले. तसेच वायर कापून सीसीटीव्हीचे डिव्हिआर नेल्याचे समोर आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

=====

मुलाच्या ऑपरेशनसाठी ठेवले होते दागिने

जाधव यांच्या लहान मुलाच्या ह्रदयात छिद्र असल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते. त्याबाबत शस्त्रक्रिया करण्यासाठी खर्चाची तजवीज म्हणून जाधव दांपत्याने सोन्याचे दागिने विक्री करण्याचे नियोजन केले होते. मात्र, चोरट्यांनी दागिने पळविल्याने आता शस्त्रक्रिया कशी करावी, असा पेच जाधव यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

================

Web Title: Thieves break into house in Raje Sambhaji Colony and snatch 12 weights of jewelery and cash