चहा पिण्यासाठी थांबलेल्या बसमध्ये चोरट्याची घुसखोरी
By Admin | Updated: October 10, 2016 01:13 IST2016-10-10T00:56:57+5:302016-10-10T01:13:37+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद-इंदोर मार्गावर धावणाऱ्या एका खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोरट्याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

चहा पिण्यासाठी थांबलेल्या बसमध्ये चोरट्याची घुसखोरी
औरंगाबाद : औरंगाबाद-इंदोर मार्गावर धावणाऱ्या एका खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोरट्याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. चहा, नाश्ता करण्यासाठी बस एका ठिकाणी थांबल्यावर चोरट्याने पैसे आणि किमती वस्तू लंपास करणे सुरू केले. मात्र, सतर्क प्रवाशांमुळे हा प्रकार रोखला गेला; परंतु चोरटा दुचाकीस्वार साथीदाराच्या मदतीने पसार होण्यात यशस्वी झाला.
औरंगाबाद येथून इंदोरसाठी शनिवारी रात्री १०.३० वाजता ही बस रवाना झाली होती. प्रवासी झोपेत असताना लिफ्ट घेऊन एक व्यक्ती या बसमध्ये बसला होता. ही बस रविवारी पहाटे प्रीतमपूर येथे चहा, नाश्ता करण्यासाठी थांबविण्यात आली. यावेळी सर्व प्रवासी खाली उतरले होते. त्याचदरम्यान एक व्यक्तीने प्रवाशांच्या बॅगांची तपासणी सुरू केली. दरम्यान, प्रवासी आमेर जेतपूरवाला हे बसमध्ये चढले. तेव्हा त्यांना त्यांच्या बॅगमध्ये सदर व्यक्ती तपासणी करीत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीस तात्काळ पकडले. परंतु त्या व्यक्तीने धक्का मारून पळ काढला. बसच्या काही अंतरावर एक दुचाकीस्वार उभा होता. ते दोघेही सुसाट निघून गेल्याचे जेतपूरवाला यांनी सांगितले.
या बसमधील एका प्रवाशाचे पाच हजार रुपये, एका महिलेची पर्स घेऊन चोरटा पसार झाल्याचेही जेतपूरवाला यांनी सांगितले. या प्रकाराची त्यांनी संबंधित ट्रॅव्हल्सच्या इंदोर व औरंगाबादेतील कार्यालयास माहिती दिली. परंतु असा काही प्रकार झाला नसल्याचे ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले.