फेडरेशनचा मोती नाकापेक्षा जड

By Admin | Updated: May 7, 2014 23:43 IST2014-05-07T23:43:07+5:302014-05-07T23:43:37+5:30

लातूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे़

The thick of the Federation's pearl nose | फेडरेशनचा मोती नाकापेक्षा जड

फेडरेशनचा मोती नाकापेक्षा जड

लातूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे़ याठिकाणी बाजार समित्यांपेक्षा चांगला दर मिळत असल्याने शेतकर्‍यांची हरभरा विक्रीला गर्दी होत आहे़ मात्र फेडरेशनकडे असलेल्या यंत्रणेच्या अभावामुळे शेतकर्‍यांना चार ते पाच दिवस ताटकळत थांबावे लागत आहे़ त्यामुळे वाहनांच्या भाड्यापोटी दररोज ५० हजार रुपयांहून अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे़ त्यातच १० तारखेला हे केंद्र बंद करण्याच्या सूचना असल्याने शेतकर्‍यांची घालमेल वाढली आहे़ नाफेडच्या वतीने लातुरातील एमआयडीसी भागात असलेल्या वखार महामंडाळाच्या गोदामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन हरभरा खरेदी केंद्र चालवीत आहे़ शासनाने ठरवून दिलेल्या ३१०० रुपये हमीभावाने हरभरा खरेदी केला जात आहे़ बाजार समित्यांमध्ये मिळणार्‍या दरापेक्षा जास्त दर याठिकाणी मिळत असल्याने शेतकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली आहे़ परंतु, फेडरेशनकडे यंत्रणेचा अभाव असल्याने वजनकाट्यांची संख्या कमी आहे़ परिणामी, दिवसाकाठी सरासरी केवळ १५०० क्विंटल हरभर्‍याची मोजदाद केली जात आहे़ त्यामुळे बाहेरगावहून आलेल्या शेतकर्‍यांची मोठी गैरसोय होत आहे़ अनेक शेतकरी चार ते पाच दिवसांपासून वाहने अन् त्यातील शेतमाल राखत बसले आहेत़ आधीच गारपिटीने शेतकर्‍यांना तडाखा दिला आहे़ त्यातून कसेबसे बचावलेले शेतमाल घेऊन शेतकरी खरेदी केंद्रावर रांगा लावत आहेत़ हरभर्‍यातून तरी चार पैसे जास्तीचे मिळतील, या अपेक्षेने शेतकरी ताटकळत का असेना परंतु, केंद्राभोवती मुक्काम ठोकून आहेत़ बरेचशे शेतकरी वाहनात किंवा वाहनाच्या बाजूलाच रात्रीची झोप घेत आहेत़ हरभरा चोरीस जावू नये, या उद्देशाने ते येथे तळ ठोकून आहेत़ त्यामुळे झोप, अंघोळ व आहाराचे वांधेच झाले आहेत़ त्याहूनही वाहनाचे भाडे वाढत असल्याने शेतकरी बेजार झाला आहे़ त्यातच १० मेपासून खरेदी केंद्र बंद करण्याच्या सूचना असल्याने रांगेत शेवटच्या टप्प्याला असलेल्या शेतकर्‍यांची आणखीच घालमेल वाढली आहे़ दररोज जवळपास ३५ ते ४० वाहने केंद्राजवळ थांबून असतात़ मालवाहू जीप, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, अ‍ॅपे अशा वाहनातून शेतकर्‍यांनी हरभरा आणला आहे़ अ‍ॅपेला ७०० रुपये प्रतिदिन भाडे तर ट्रॅक्टर, मालवाहू जीपला १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे़ टेम्पो व ट्रक २ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारतात़ काही वाहनचालकांनी आतील पोत्यांवर भाडे आकारले आहे़ क्विंटलचे प्रतिपोते ७० रुपये भाडे आकारले जात आहे़ त्यानुसार मोठ्या वाहनात जवळपास तीन-चार शेतकर्‍यांनी मिळून शंभर-सव्वाशे क्विंटल हरभरा आणला आहे़ त्याचे प्रतिदिन भाडे परवडण्याजोगे नाही़ दिवसाकाठी येथे थांबून राहिलेल्या वाहनांचे भाडे जवळपास ५० हजारांवर जात आहे़ त्याची पूर्ण झळ शेतकर्‍यांनाच बसत आहे़ (प्रतिनिधी) कोणी चार तर कोणी पाच दिवसांपासून ताटकळत बसले़़़ कानडी बोरगाव येथून आलेले शेतकरी गोवर्धन मोरे म्हणाले, तिघांनी मिळून १२७ क्विंटल हरभरा ट्रकने आणला आहे़ रविवारपासून येथे आहोत़ उद्या नंबर लागेल, अशी आशा आहे़ ट्रकला दररोज २१०० रुपये भाडे थांबल्या ठिकाणी भरत आहोत़ बोरगावचेच अंगद फरकांडे म्हणाले, आम्ही शेतकर्‍यांनी समुहाने शेतमाल आणला आहे़ चार दिवसांपासून याठिकाणी आहोत़ झोप, जेवण, अंघोळीची गैरसोय होत असल्याने आलटून-पालटून राखणदारी करीत आहोत़ ट्रॅक्टरला रोज १००० रुपये भाडे भरत आहोत़ शिवाय, क्विंटलला सुरुवातीला दिलेले ७० रुपये भाडे वेगळेच़ नाराज कोणीही नाही़़़ एकाच केंद्रावर किती वजनकाटे, चाळण्या बसवायच्या? यंत्रणा तोकडी आहे़ याविषयी नाफेडला कळविले आहे़ शेतकरी योजनेवर खूष आहेत़ नाराज कोणीही नाहीत़ तोकड्या यंत्रणेमुळे आमचाही नाईलाज होतो़ करणार काय? असे जिल्हा मार्केटींग अधिकारी सुमठाणे म्हणाले़ दरम्यान, विक्री केंद्र बंद करण्यास मुदतवाढ मिळाली तर आमचे बरे होईल़ शासनाने ती मुदतवाढ द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली़

Web Title: The thick of the Federation's pearl nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.