पंढरपुरात पुन्हा दोघांना लुटले
By Admin | Updated: July 6, 2014 00:35 IST2014-07-06T00:24:20+5:302014-07-06T00:35:18+5:30
वाळूज महानगर : पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून टीसीआय कंपनीचा कॅशिअर व सुपरवायझरच्या एटीएममधून बळजबरीने १५ हजार रुपये काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये घडली.

पंढरपुरात पुन्हा दोघांना लुटले
वाळूज महानगर : पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून टीसीआय कंपनीचा कॅशिअर व सुपरवायझरच्या एटीएममधून बळजबरीने १५ हजार रुपये काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये घडली. विशेष म्हणजे पोलिसांनी रात्रीच फिर्याद घेऊन आलेल्या दोघांना उद्या गुन्हा नोंदवू असे सांगून जायला सांगितले.
औरंगाबाद- नगर महामार्गावर गरवारे कंपनीजवळ टीसीआय कंपनीत काम करणारे सुपरवायझर योगेशकुमार यादव (२३) व कॅशिअर संदीपकुमार शर्मा (२२, दोघेही रा. बजाजनगर) हे ४ च्या सुमारास अॅपेरिक्षाने पंढरपुरातील तिरंगा चौकात उतरले. रिक्षातून उतरताना अनोळखी तरुणाने योगेशकुमारला पाय आडवा टाकून धक्का लागण्याचे निमित्त करून त्याच्याशी वाद सुरू केला. संदीपकुमार शर्माने मध्यस्थी करताच त्या दोघांनी वादावादी वाढविली व शर्मा व यादव यांना जवळच असलेल्या बॉम्बे स्टेशनरीजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीनजीक घेऊन गेले. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांना त्या इमारतीत डांबून ठेवले. त्यांची अंगझडती घेतली, खिसे तपासले. शर्मा व यादव यांचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड या दोघांनी धाक दाखवून काढून घेतले. संदीपकुमारच्या मानेवर एकाने चाकूने निसटता वार केल्यामुळे दोघेही घाबरून गेले. जिवे मारण्याची धमकी देत चोरट्यांनी दोघांना तिरंगा चौकातील एक्सिस बँकेच्या एटीमजवळ आणले. यातील एक जण संदीपकुमारला सोबत घेऊन एटीएम रूममध्ये गेला. दुसऱ्याने योगेशकुमारला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसविले.
सायंकाळी ४.२० मिनिटांनी एकाने संदीपकुमारच्या एटीएम कार्डद्वारे ३ हजार काढून घेत त्या दोघांना एका रिक्षात बसवून शहराकडे नेले. बाबा पेट्रोल पंपावरील एचएफडीसी बँकेच्या एटीममधून एकाने यादवच्या खात्यातून १० हजार व संदीपकुमारच्या खात्यावरून आणखी २ हजार रुपये काढले. शस्त्राच्या धाकावर त्या दोघांनी शर्मा व यादवच्या खिशातील रोख १ हजार रुपये व योगेशकुमारचा मोबाईल हिसकावून घेतला.
शनिवारी सकाळी ही घटना प्रसिद्धी माध्यमांना समजली. सर्वत्र चर्चा सुरू झाल्यामुळे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आज दुपारी योगेशकुमारच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध १५ हजार रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल झाला.
वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या महिनाभरापासून दरोडेखोर व चोरट्यांचेच जणू राज्य आहे. पंढरपुरातील उद्योग आयकॉन या कॉम्प्लेक्समध्ये दोन सुरक्षारक्षकांना मारहाण करीत डांबून ठेवून चोरट्यांनी ६ दुकाने फोडली होती. याच कॉम्प्लेक्समधील मणप्पुरम या सोने तारण ठेवणाऱ्या बँकेची तिजोरी न फुटल्यामुळे जवळपास २ कोटी रुपयांचे सोने वाचले होते. पंढरपुरातील भाजीमंडईत निसार शेख या तरुणावर गोळीबार करून फरार झालेले हल्लेखोर अद्यापही सापडलेले नाहीत.
सिडको वाळूज महानगरातही दोन घरे फोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लांबविला होता. याच परिसरात शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्रही चोरट्याने लांबविले होते. ३ जुलै रोजी पोलीस ठाण्यासमोरच टान्सपोर्टच्या कर्मचाऱ्याला दिवसा मारहाण करून चोरट्यांनी ४० हजार रुपये लुटले होते.
तिरंगा चौक बनले लुटमारीचे केंद्र
पंढरपुरातील तिरंगा चौक लुटमारीचे केंद्र बनले असून, आतापर्यंत या ठिकाणी तीन गंभीर गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्राचे तिरंगा चौक हे प्रवेशद्वार असून, या चौकात रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही गंभीर गुन्हे वाढतच आहेत. या चौकात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले आहेत.
भाड्यासाठी दिले १०० रुपये
या दोघांना लुटल्यानंतर चोरट्यांनी दोघांकडील ३० रुपये घेऊन त्यांना घरी जाण्यासाठी १०० रुपये भाड्यासाठी दिल्याचे शर्मा व यादव यांनी सांगितले. हे दोघे कर्मचारी घरी परतले. त्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. रात्रीच त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घटनाक्रम सांगितला. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करू, असे सांगून त्यांना पोलिसांनी परत पाठविले.