‘त्या’ सात गावांची केली दिशाभूल
By Admin | Updated: July 27, 2014 01:16 IST2014-07-27T00:40:20+5:302014-07-27T01:16:13+5:30
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत.

‘त्या’ सात गावांची केली दिशाभूल
सुनील चौरे, हदगाव
तालुक्यातील त्या सात गावांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी महसूल मंडळ देण्याचे मान्य केले असून या ठिकाणी नायब तहसीलदार थांबणार आहेत. परंतु ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करण्याच्या मागणीची शासनाकडून दिशाभूल करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया सात गावांतील ग्रामस्थांतून उमटत आहेत.
हदगाव तालुक्यातील अर्धापूरलगत असलेली निमगाव, रोडगी, चोरंबा, चाभरा, सोनाळा, खैरगाव व चाभरातांडा ही सात गावे अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात गत १५ वर्षांपासून मागणी सुरु आहे. या गावांसाठी हदगाव हे तालुक्याचे ठिकाण ४५ ते ५० किमी तर अर्धापूर ५ ते ७ किमी अंतरावर आहे. तहसील, पं. स. महसूल, कृषी तसेच इतर सर्वच कामांसाठी येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे वेळ व पैसा खर्च करुनही वेळेवर कामे होत नाहीत. याचा परिणाम विकासाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहोचत नसल्याने सदर गावे विकासापासून कोसोदूर राहिली आहेत. तालुका बदलीच्या मागणीसाठी सात गावच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या, परंतु त्यांच्या समस्या कोणीही ऐकायला तयार नाही. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेवून वेळोवेळी आंदोलने करुन प्रशासनापुढे महसूल अर्धापूर तालुक्याला जोडण्यासंदर्भात मागणी लावून धरली. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच पालकमंत्री डी.पी.सावंत यांची भेट घेवून अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
यानंतर महसूलमंत्र्यांनी मुंबई येथे शिष्टमंडळाची बैठक बोलावून सदर सात गावांचे महसूल मंडळ अर्धापूरला जोडण्याचे अश्वासन दिले होते, मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तालुका समावेशाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु या गावांचा तालुका बदलायचा सोडाच तर महसूल मंडळही अर्धापूर तालुक्याला जोडले नाही.
२६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हदगाव येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सात गावांचा महसूल विभाग अर्धापूरला जोडणे शक्य नाही, त्यावर उपाय म्हणून नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आठवड्यातील सोमवार व बुधवार असे दोन दिवस चाभरा व निमगाव येथे दिवसभर कर्तव्य बजावतील, अशी व्यवस्था केली आहे. यावेळी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सात गावांच्या कामकाजासाठी ्आठवड्यातून दोन दिवस नायब तहसीलदारांसह महसूल, पोलिस विभाग, पंचायत समिती, कृषीसह इतर विभागाचेही कर्मचारी थांबून जनतेची कामे करतील.
- संतोष गोरड, तहसीलदार हदगाव