अग्निशामक दलात ३ वाहने येणार
By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:10:42+5:302014-07-06T00:23:18+5:30
जालना : येथील अग्निशामक दलात आणखी तीन गाड्या सामील होणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांनी दिली.

अग्निशामक दलात ३ वाहने येणार
जालना : येथील अग्निशामक दलात आणखी तीन गाड्या सामील होणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांनी दिली.
येथील अग्निशामक दलात सध्या ४ गाड्या आहेत. त्या चारही गाड्या सुस्थितीत आहेत. परंतु अग्निशामक दलाचे बळकटीकरण व्हावे म्हणून राज्य सरकारने या दलास आणखी चार गाड्या देण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ त्यासाठी खास तरतूदही केली. त्यात ३९ लाख रुपयांच्या तरतुदीतून ३ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात औरंगाबाद येथील एका एजन्सीला आॅर्डरही देण्यात आली आहे.
या दलात समाविष्ट होणारी ही तीनही वाहने अत्याधुनिक पध्दतीची असणार आहेत.
विशेषत: या वाहनातील पाण्याच्या टाकीची क्षमता साडेचार हजार लिटर एवढी असणार असून या वाहनांची बांधणी सोलापूर येथे होणार आहे.
येत्या १५ दिवसांच्या आत ही वाहने येथील अग्निशामक दलात सामील होतील, यामुळे शहरासह जिल्हावासीयांसाठी ही वाहने सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास नगराध्यक्षा भरतिया यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
(प्रतिनिधी)
आता कर्मचाऱ्यांचा प्रश्न
येथील अग्निशामक दलाचे बळकटीकरण होणार आहे. परंतु पहिल्या चार व नव्याने दाखल होणाऱ्या तीन अशा एकूण सात वाहनांकरिता पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करणे गरजेचे ठरणार आहे. सध्या या दलात २४ कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यात चालकांची संख्या सात एव्हढी आहे. एकूण सात वाहनांवर ४९ कर्मचाऱ्यांची गरज आहे. एका वाहनावर किमान सात कर्मचारी असावेत, असे सरकारचे संकेत आहेत. त्यामुळे २५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पालिका प्रशासनास राज्य सरकारकडून पाठपुरावा करीत मंजुरी आणावी लागणार आहे. तरच अग्निशामक दलाचे बळकटीकरण होईल.