सांडपाण्याचा प्रश्न लागणार मार्गी
By Admin | Updated: May 23, 2017 00:14 IST2017-05-23T00:13:56+5:302017-05-23T00:14:42+5:30
जालना : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजना राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात येणार आहेत

सांडपाण्याचा प्रश्न लागणार मार्गी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजना राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातून हा मलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शहरातील सांडपाण्यावर या प्रकल्पातून प्रक्रिया होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. विस्तार पाहता शहरातून सुमारे चारशे किमी भूमिगत गटार योजना राबविण्यात येणार असून, यातून ५० एमएलडी सांडपाणी दररोज वाहून जाण्याची क्षमता असणार आहे. यासाठी डी. आय पाईपसोबतच अन्य पाईपचा वापर करण्यात येणार आहे. जमिनीत अडीच ते फुट खोलीवर सदर पाईप असणार आहेत. शहरातील मलनिस्सारण प्रकल्पास २०१६-२०१७ आर्थिक वर्षात प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पातंर्गत प्रामुख्याने कामाचा सर्व्हे, मेन टँक, वेट वेल, समांतर पूल, समांतर रस्ता,
प्रक्रिया प्रकल्प, पंम्पिंग मशनरी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० एमएलडीचा प्लांट उभारण्यात येणार आहे. सोबतच नाल्यांचे बांधकाम व दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ६८ कोटींची मंजुरी मिळाली आहे. मलनिस्सारण प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करावयाचा असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार असणार आहे.