शहरातील अंधार होणार दूर
By Admin | Updated: August 19, 2014 02:13 IST2014-08-19T01:36:16+5:302014-08-19T02:13:24+5:30
परभणी : महानगरपालिकेला पथदिवे बसविण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत ५ हजार पथदिवे शहरात बसविले जाणार आहेत.

शहरातील अंधार होणार दूर
परभणी : महानगरपालिकेला पथदिवे बसविण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत ५ हजार पथदिवे शहरात बसविले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील रस्त्यांवरील अंधार दूर होणार आहे.
शहरात विविध रस्त्यांवर तसेच वसाहतीमधील रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने दिवे बसविले जातात. वाहतुकीला त्रास होणार नाही. तसेच परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य राहणार नाही, या उद्देशाने शहरामध्ये ठिकठिकाणी पथदिवे बसविले आहेत. मागील काही वर्षांपासून पथदिवे बसविण्यात आले खरे. परंतु, त्यातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत आहेत.
मुख्य रस्त्यावरील अनेक चौकांमधील पथदिवे नियमितपणे सुरु असतात. परंतु, वसाहतींमधील पथदिव्यांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. पथदिवे नसल्याने वसाहतींमध्ये अंधार पसरलेला असतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच या अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वेळोवेळी मागणी करुनही वसाहतींमध्ये पथदिवे बसविले जात नव्हते. प्रत्यक्षात पथदिव्यांचे साहित्य मनपाकडे उपलब्ध नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते.
पथदिव्यांच्या प्रश्नावर मनपाने पाठपुरावा केला असून हा प्रश्न आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. मुलभूत सुख-सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान योजनेतून ५ कोटी रुपये मनपाला मंजूर झाले आहेत.
या पाच कोटी रुपयांमधून एलईडी स्ट्रीट लाईट आणि मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसविले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागातही एलईडी दिवे बसविले जातील.
सुमारे पाच हजार दिवे बसविण्यात येणार असून २० चौकांमध्ये हायमास्ट दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंधार दूर होणार आहे. (प्रतिनिधी)