पैठण नगर परिषदेत तीन नगरसेवक वाढले
By Admin | Updated: May 11, 2016 00:52 IST2016-05-11T00:27:34+5:302016-05-11T00:52:11+5:30
पैठण : पैठण नगर परिषदेची सदस्य संख्या तीनने वाढल्याने नगरसेवकांची संख्या २० वरून २३ झाली आहे. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात सदस्य संख्या वाढली असून

पैठण नगर परिषदेत तीन नगरसेवक वाढले
पैठण : पैठण नगर परिषदेची सदस्य संख्या तीनने वाढल्याने नगरसेवकांची संख्या २० वरून २३ झाली आहे. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात सदस्य संख्या वाढली असून स्वीकृत सदस्यांची संख्याही एकने वाढली आहे. आता तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. यामुळे पैठण शहराच्या कारभाराचा गाडा पुढील पंचवार्षिकपासून २६ सदस्य ओढणार आहेत.
नगर परिषदेची आगामी निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असून आतापासूनच या निवडणुकीची उत्सुकता वाढीस लागली आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांचा जनसंपर्क अलीकडे वाढला असून जयंतीसह सार्वजनिक कार्यक्रम व डिजिटलवर या मंडळींची उपस्थिती दिसून येत आहे.
वार्डाचे झाले प्रभाग
वार्ड रचना बदलून आगामी निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने वॉर्डापुरते मर्यादित लक्ष घालणाऱ्या इच्छुकांना मात्र कार्यक्षेत्र वाढवावे लागत आहे. वार्डापुरती फिल्डिंग लावून बसलेल्यांना फिल्डिंगच्या कक्षा अचानक वाढवाव्या लागल्याने, त्यांना मोठा झटका बसला आहे. उगाच सरकारने वार्डाचे प्रभाग करून डोक्याला ताण वाढवला असून खिशालाही डबल फटका बसणार असल्याची प्रतिक्रिया या इच्छुक उमेदवारांतून ऐकावयास येत आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार पैठण शहराची लोकसंख्या ४१ हजार ५१४ एवढी झाली असून यात अनुसूचित जाती ५ हजार ८९१ व अनुसूचित जमातीच्या ५१९ लोकसंख्येचा समावेश आहे. यानुसार नगर परिषदेसाठी २३ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात २३ पैकी १२ सदस्य महिला राहतील.
२३ सदस्य संख्येचे आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती- ०३, नागरिकाचा मागास प्रवर्ग - ०६, खुला ( सर्वसाधारण) - १४.
महिला आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती ३ पैकी २ महिलांसाठी राखीव. नागरिकांचा मागासवर्ग ६ पैकी ३ महिलांसाठी राखीव व सर्वसाधारण १४ पैकी ७ महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
नगर परिषदेच्या एका प्रभागातून चारऐवजी आता दोन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. दोन नगरसेवकाचा एक वार्ड अशी रचना आगामी निवडणुकीसाठी राहणार आहे. यामुळे वार्ड कसे तुटतात व कसे सुटतात या चिंतेने भावी उमेदवारांची झोप उडाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी आगामी निवडणुका थेट जनतेतून होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे. या बातमीने अनेकांना मोठा झटका बसला आहे. पैठण शहराचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटलेले असून आगामी नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने अडीच वर्षांसाठी काढलेले आरक्षण आता बदलावे लागणार आहे. यामुळे आपल्या प्रवर्गातील आरक्षण नगराध्यक्षपदासाठी निघावे म्हणून इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत, तर ओबीसी महिला प्रवर्ग आरक्षणातील इच्छुक उमेदवारांत मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आले. दिवसभर या अनुषंगाने पैठण शहरात गटागटाने खमंग चर्चा सुरू होती.