पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:41 IST2017-09-09T00:41:58+5:302017-09-09T00:41:58+5:30
सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ४० टक्के पाऊसही अद्याप झालेला नाही.

पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ४० टक्के पाऊसही अद्याप झालेला नाही.
यंदा जूनच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकºयांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठी ओढ दिल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस पाऊस मुक्कामी होता. याच कालावधीत जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांत अतिवृष्टीही झाली. या पावसामुळे चार वेळेस विष्णूपुरीचे दरवाजे उघडावे लागले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५३.४४ टक्के इतका पाऊस झाला असून नांदेड तालुक्यात ८३.०१, मुदखेड ८४.६८, अर्धापूर ६९.८६, भोकर ५३, उमरी ४९.९५, कंधार ६१.३७, लोहा ६१.३२, किनवट ४०.३८, हदगाव ५३.९६, बिलोली ५०.०४, धर्माबाद ५१.०१, नायगाव ५२.७८ तर मुखेड तालुक्यात ५६.३५ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात वाईट परिस्थिती माहूर तालुक्यातील असून येथे आजवर वार्षिक सरासरीच्या अवघ्या ३१.१६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातही अशीच परिस्थिती असून तेथे सरासरीच्या ३७.६४ टक्के तर देगलूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ३७.१० टक्के इतका पाऊस झाला आहे.